धक्कादायक: परीक्षेत 'जय श्री राम', क्रिकेटरची नावे लिहिली; गुण मिळाले 56 टक्के, पुनर्तपासणीत 4 गुण; शिक्षक बडतर्फ 

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

धक्कादायक: परीक्षेत 'जय श्री राम', क्रिकेटरची नावे लिहिली; गुण मिळाले 56 टक्के, पुनर्तपासणीत 4 गुण; शिक्षक बडतर्फ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

परीक्षेत उत्त्रपत्रिकेमध्ये (answer sheet)उत्तराऐवजी गमतीशीर वाक्य लिहिण्याची उदाहरणे नेहमी समोर येत असतात. पण परीक्षेशी संबंध नसलेल्या गोष्टी लिहिलेले विद्यार्थी चक्क उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. RTI मधून अशा उत्तरपत्रिका शोधून त्यांची पुनर्तपासणी केली असता या विद्यार्थ्यांना मुळात 0 ते 4 गुण मिळाले असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत 'जय श्री राम' (Jai Shri Ram)आणि क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिल्याचे दिसून आले.

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यापीठातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फार्मसीच्या प्रथम वर्षाचे चार विद्यार्थी ५६ टक्के गुणांसह या विद्यापीठातून उत्तीर्ण झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत प्रश्नांची उत्तरे लिहिण्याऐवजी 'जय श्री राम' आणि क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिली होती. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. यानंतर विद्यापीठात एकाच खळबळ उडाल. विद्यापीठाच्या परीक्षा समितीने शिक्षक डॉ. आशुतोष गुप्ता आणि डॉ. विनय वर्मा यांना दोषी ठरवून त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विद्यापीठाचा माजी विद्यार्थी दिव्यांशु सिंग याने फार्मा अभ्यासक्रमाच्या १८ विद्यार्थ्यांचे रोल नंबर देऊन माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्या उत्तरपत्रिकेच्या  प्रती मागितल्या होत्या. विद्यापीठाने दिलेल्या प्रतमध्ये (बार कोड क्रमांक 4149113), विद्यार्थ्याने लिहिले होते ' जय श्री राम मला पास करा.' याशिवाय विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आदी खेळाडूंची नावे लिहिली होती. हा विद्यार्थी ७५ पैकी ४२ गुणांसह उत्तीर्ण झाला. 4149154, 4149158 आणि 4149217 या बार कोडच्या प्रतींमध्येही अशीच काही भाषा लिहिलेली आढळली. हे विद्यार्थीही उत्तीर्ण झाले आहेत. या संदर्भात प्रतिज्ञापत्रासह तक्रार केली असता, राजभवनने 21 डिसेंबर 2023 रोजी चौकशी आणि कारवाईचे आदेश दिले होते.

फार्मसी विभागाचे प्रा. विनय वर्मा यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे मागितल्याचा व्हिडिओ सुध्दा नुकताच व्हायरल झाला होता. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली ते पैशांची मागणी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून प्रशासकीय कामकाज काढून घेण्याचे आदेश देण्यात आले,असे असतानाही अनेक प्रशासकीय कामात त्यांना नोडल ऑफिसर करण्यात आले.

राजभवनच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या तपासणीत ५० उत्तरपत्रिकांमध्ये जास्त गुण देण्यात आल्याचे आढळून आले आहे. उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन केले असता या विद्यार्थ्यांना 0 ते 4 दरम्यान गुण मिळाले आहेत. चौकशी समितीच्या अहवालात  चुकीच्या मूल्यांकनात दोन शिक्षक दोषी असल्याचे आढळले आहे.