माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ, आई-वडिलांच्या मालमत्तेची चौकशी
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेची माहिती देण्याची मागणी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वादग्रस्त माजी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कारण त्यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेची चौकशी (Property inquiry) करण्यात येणार आहे. नॉन क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्राच्या आधारे आयएएस पद मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या मालमत्तेची माहिती देण्याची मागणी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकांकडे (Inspector General of Registration) केली आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढणार आहेत.
पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एकत्रित माहिती गोळा करून प्रशासनाची समिती उत्पन्नाची मर्यादा ठरवणार आहे. खेडकर यांच्या मालमत्तेची चौकशी हा प्राप्तिकर विभागाच्या चौकशीचा एक भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे उत्पन्न कोटींमध्ये असतानाही त्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने फसवणूक आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून पूजा दिलीप खेडकर यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान, बनावट दिव्यांग आणि ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत पूजा खेडकर यांनी 2023 च्या आयएएस बॅचमध्ये स्थान मिळवल्याचा आरोप होता. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एनटी संवर्गातून प्रवेश मिळवतानाही नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडले होते. दिलीप खेडकर त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळात अधिकारी होते. त्यामुळे 2007 मध्ये त्यांचे उत्पन्न 4 लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.
पूजा खेडकर यांनी 2023 मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ओबीसी संवर्गातून तसेच दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून आयएएसची श्रेणी मिळवली होती. त्यासाठी त्यांनी पुन्हा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र जोडले होते. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी 40 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पूजा यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले, असा प्रश्न उपस्थित झाला होता.