ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ
ब्लॅाकचेन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थांनी स्वतःच्या विकासासोबतच समाज आणि देशासाठी डेटा सुरक्षा पोहचवण्यात योगदान द्यावे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) तंत्रज्ञान विभागात (Department of Technology)बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजीच्या (blockchain technology) पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात झाली आहे. बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी हा पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले राज्यस्तरीय विद्यापीठ (first state level university in the country)ठरले आहे. या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. विद्यार्थी आणि पालकांचा या अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रवेश मर्यादा पूर्ण भरली आहे.
तंत्रज्ञान विभागामध्ये या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून ब्लॅाकचेन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॅा. आदित्य अभ्यंकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ब्लॅाकचेन तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. सध्याचे युग हे डेटा युग आहे. ब्लॅाकचेन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थांनी स्वतःच्या विकासासोबतच समाज आणि देशासाठी डेटा सुरक्षा पोहचवण्यात योगदान द्यावे. विद्यार्थी असण्याचे खरे लक्षण म्हणजे ‘जिज्ञासूपणा’असतो. कोणताही प्रश्न हा दुर्लक्षित करणारा नसतो. विद्यार्थ्यांनी शिकताना जास्तीत जास्त प्रश्न विचारून संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात.
कार्यक्रमात ‘झो’ या ब्लॅाकचेन प्लॅटफॅार्मचे प्रतिनिधी फारूक चिस्टी यांनी विद्यार्थांना वेब ३ प्लॅटफॅार्मची तसेच डिजिटल करन्सीची ओळख करून दिली. ब्लॅाकचेन क्षेत्रात असणाऱ्या रोजगाराच्या संधींची ओळख करून देऊन आणि त्या संधीपर्यंत पोहचण्यासाठीच्या नेटवर्कींमध्ये विद्यार्थांना जोडण्यात आले.
जगभरातील डेटा सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॅाकचेन तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. फक्त देशातच नाही तर जगभरात खाजगी आणि सरकारी अशा सर्वच क्षेत्रात ब्लॅाकचेन डेव्हलपर आणि ब्लॅाकचेन आर्कीटेक्चर्सची मागणी वाढत आहे. ही गरज ओळखूनच बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नॅालॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला होता. या पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॅा. पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव डॅा. विजय खरे यांनी शुभेच्छा दिल्या.
-----------------------------
विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सातत्याने प्रयत्न असतो. ब्लॅाकचेन तंत्रज्ञान डेटा सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण असल्याने या तंत्रज्ञानाची गरज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने विचार करावा.
- डॅा. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-------------------------------
विद्यार्थी आणि पालक करिअरच्या बाबतीत जागरूक होत आहेत. भविष्यातील संधी ओळखून या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेसचा समावेश करण्यावर भर देत आहे.
-डॅा. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
-----------------------
आयटी क्षेत्रामध्ये सतत नविन तंत्रज्ञानांचा समावेश होत आहे. इंडस्ट्री ४.० मध्ये समावेश असलेल्या तंत्रज्ञानांची क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःला अपग्रेड करत रहावे.
डॅा. विजय खरे , प्रभारी कुलसचिव , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
eduvarta@gmail.com