‘त्या’ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शुल्क माफी! महाविद्यालये उदासीन

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी नुकतेच याबाबत सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून सुचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शुल्क माफी! महाविद्यालये उदासीन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

कोरोनामुळे (Covid-19) आई-वडील, पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण शुल्क माफ करण्याच्या सुचना उच्च शिक्षण विभागाने (Higher Education Department) सर्व विद्यापीठे (University) व महाविद्यालयांना (College) दिले आहे. तसेच इतर विद्यार्थ्यांकडून या कालावधीतील अतिरिक्त शुल्क माफ (Educational Fee) करण्यासही सांगण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी सुचना दिल्यानंतरही अनेक महाविद्यालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने विभागाकडून याबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे.

 

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर (Dr. Shailendra Deolankar) यांनी नुकतेच याबाबत सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून सुचनांचे पालन करण्याचे आदेश दिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, दि. २८ जून २०२१ रोजी तत्कालिन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीमध्ये कुलगुरु यांनी दिलेल्या सहमतीनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थी विद्यार्थीनीचे आई, वडील, पालक  कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झाले असतील अशा विद्यार्थ्यांचे-विद्यार्थीनीचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात यावे, असे नमूद करण्यात आले आहे.

कोणत्या महाविद्यालयांचे रूपांतर होऊ शकते समूह विद्यापीठात : डॉ. शैलेन्द्र देवळाणकर

 

अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणा-या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी  आणि युथ फेस्टीवल अशा ज्या बाबींकर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबीसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयांमध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी, विद्यार्थ्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात न आल्याने वसतिगृह  शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे, अशाही सुचना करण्यात आल्या आहेत.

 

विनाअनुदानित कायम विनाअनुदानित महाविद्यालयात देखील इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टीव्हल अशा ज्या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही. त्या बाबीसाठी आकारण्यात येणारे शुल्क माफ करण्यात यावे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात ज्या वर्षाच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्या वर्षाचे परीक्षा शुल्क पुढील शैक्षणिक वर्षात समायोजित करण्यात यावे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ टप्यात भरण्याची सवलत देण्यात यावी, तसेच शुल्क थकित असेलतर परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये. विद्याच्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी ताकीदही देण्यात  आली आहे.

 

सन २०२०-२१ व २०२२-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये याप्रकरणी किती विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे, याबाबतची वर्षनिहाय माहिती या संचालनालयास पाठवावी, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी शासनाने वेळोवेळी अवगत केलेले आहे,  तथापि या निदेशानुसार अनुपालन झाल्याचे दिसून येत नाही. तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमात खंड पडू नये, यास्तव शैक्षणिक हित विचारात घेऊन शासन निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यास्तव विद्यापीठांना अवगत करण्यात येत आहे, असे देवळाणकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO