विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी अन् केळी

स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव अंडा बिर्याणी या स्वरूपात या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या दिवशी आहारासोबत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून द्यावे.

विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी अन् केळी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत (Centrally sponsored Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana ) राज्यातील शासकीय तसेच अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या (School nutrition) माध्यमातून अंडी व केळी देण्याचा निर्णय (Decision to give eggs and bananas) घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भोजनात या पुढील काळात केळी व स्थानिक फळे दिले जाणार आहेत.

हेही वाचा : विद्यापीठात दोन पेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास बंदी ; पोलिसांकडून १८८ कलम लागू

शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या तांदळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. केंद्र शासनाच्या या योजनेअंतर्गत मंजूर वार्षिक अंदाजपत्रकाच्या पाच टक्के निधीतून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. पोषण आहारात अतिरिक्त पौष्टिक पदार्थ म्हणून विद्यार्थ्यांना अंडी व केळी देण्यात यावी, अशी विनंती कृषी विभागातर्फे करण्यात आली होती.तसेच शासनामान्य द्रोपडी शेतकरी गटातर्फे याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता.त्यास शासनाने मान्यता दिली आहे. 

अंड्यामध्ये उच्च प्रतीचे प्रथिने,  उष्मांक , जीवनसत्वे , लोह , कॅल्शियम,  कार्बोहायड्रेट असल्याने पोषण आहारात अंड्यांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी अंडी खात नाहीत; अशा विद्यार्थ्यांना केळी अथवा स्थानिक फळ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना अतिरिक्त पोषणमूल्य मिळणार आहे. या बाबीचा विचार करून 2023- 24 या आर्थिक वर्षामध्ये या योजनेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत मंजूर निधीतून 23 आठवड्या करिता नियमित पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना अंडी व केळी देण्यात यावीत,असे आदेश शासनाने दिले आहेत. 

सद्यस्थितीतील अंड्यांचा बाजार भाव विचारात घेता एका अंड्यासाठी पाच रुपये इतका दर निर्धारित करण्यात आला आहे. सदर उपक्रम ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच शहरी भागात केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली मार्फत आहार पुरवणाऱ्या आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत राबविण्यात यावा. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक बाजारपेठेतून अंडी खरेदी करून आठवड्यातील बुधवारी किंवा शुक्रवारी या दिवशी विद्यार्थ्यांना उकडलेले अंडे किंवा अंडा पुलाव अंडा बिर्याणी या स्वरूपात या योजनेचा लाभ देणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या दिवशी आहारासोबत केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून द्यावे, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.