विद्यापीठात दोन पेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास बंदी ; पोलिसांकडून १४४ कलम लागू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व विद्यापीठाच्या आवाराजवळ १०० मीटर अंतरापर्यंत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास व विद्यापीठात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

विद्यापीठात दोन पेक्षा जास्त व्यक्तींना फिरण्यास बंदी ; पोलिसांकडून १४४  कलम लागू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये निर्माण झालेल्या वादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी भिंतीवर आक्षेपार्ह लिखाण केल्याने विद्यापीठात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विद्यापीठात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन पेक्षा अधिक व्यक्तींना विद्यापीठात एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा आदेश विद्यार्थी, शिक्षक ,कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा अधिकारी यांना लागू असणार नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व विद्यापीठाच्या आवाराजवळ १०० मीटर अंतरापर्यंत विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास व विद्यापीठात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात ध्वनीक्षेपाचा वापर करण्यास मनाई आहे. तसेच विद्यापीठात कोणत्याही दोन गटात वाद निर्माण होईल, असा मजकूर लिहिण्यास व छापील मजकूर चिटकवण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. पुणे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी याबाबतचा आदेश प्रसिद्ध केला आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी चतुर्श्रुंगी पोलिसांकडे विद्यापीठात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत पत्र दिले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे नामांकित विद्यापीठ असून देश, परदेशातील विद्यार्थी येथे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रवेश घेतात. अर्थातच या विद्यार्थ्यांना विद्यापीठात शांततापूर्ण व सौदार्हपूर्ण वातावरणाची आवश्यकता असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाबाहेरील व्यक्ती व संघटनांनी विद्यापीठाची अथवा पोलिसांची परवानगी न घेता विद्यापीठात मोर्चे, आंदोलने, निदर्शने केली. तसेच विद्यापीठाच्या आवारातील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ विविध वंदनांचे आयोजन करून बाहेरील व्यक्तींना बोलवून भाषणे व घोषणा आदीद्वारे शैक्षणिक वातावरण भंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यापीठातील शैक्षणिक कार्यात व्यत्यय निर्माण होऊन त्याचे रूपांतर भांडणे व हाणामारी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणी अनेक तक्रारी व एफआयआर दाखल झाल्या आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांना शैक्षणिक पूरक व शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने पोलिसांकडून १४४  कलम लागू करण्यात आले आहे,असे या आदेशात नमूद केले आहे.