डी. फार्मसी एक्झिट परीक्षेचा एकच पेपर घेण्याची, आणि परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून ३ ऑक्टोबर ते दि. ५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणारी ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून ३ पेपर ऐवजी १ पेपर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डी. फार्मसी अभ्यासक्रम (D. Pharmacy course) केलेल्या विद्यार्थ्यांना आता फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करण्यासाठी एक्झिट परीक्षा (Exit Exam) उत्तीर्ण आवश्यक आहे. आयुर्विज्ञान विभागाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून (National Examination Board of Department of Medical Sciences) ही परीक्षा घेतली जाणार होती. मात्र फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडून ३ ऑक्टोबर ते दि. ५ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणारी ही परीक्षा स्थगित (Postponed exit exam) करण्यात आली आहे. त्यानंतर आता परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून ३ पेपर ऐवजी १ पेपर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी आयुर्विज्ञान विभागाच्या राष्ट्रीय परीक्षा मंडळाने डी. फार्मसी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार १३ सप्टेंबरला या परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत संपली. तर ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना ही एक्झिट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन पेपर द्यावे लागणार होते. या प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी ५० टक्के गुण मिळविल्यानंतरच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यानंतरच त्यांना फार्मासिस्ट म्हणून राज्यांच्या कौन्सिलकडे नोंदणी करता येईल.
एक्झिट परीक्षेसाठी तीन पेपर घेतले जाणार असल्याने त्यावर फार्मसी क्षेत्रातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच केवळ एकच पेपर घ्यावा, अशी मागणी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार पीसीआयकडून एक परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झाला नाही. परिणामी हा प्रस्ताव मान्यता प्रक्रियेत असल्याने पीसीआयने पुढील आठवड्यात होऊ घातलेली परीक्षा पुढे ढकलली आहे. एक्झिट परीक्षेच्या तीन पेपरांसाठी विद्यार्थ्यांकडून ५ हजार ९०० रुपये एवढ्या आवाढव्य परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे, त्यासाठी देखील विरोध होत आहे. पीसीआयकडून पाठवण्यात आलेला प्रस्ताव मंजूर झाल्यास, परीक्षा शुल्क देखील कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.