वादग्रस्त नाटक प्रकरण : विद्यापीठाकडून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापना

विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये,अशीही भूमिका विद्यापीठाने स्पष्ट केली आहे.

वादग्रस्त नाटक प्रकरण : विद्यापीठाकडून सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापना

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात नाटकामुळे (Drama at the Fine Arts Center)घडलेल्या घटनेमुळे समाजात उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने प्रकटन जाहीर केले असून त्यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे नमूद केले आहे.तसेच विद्यापीठामधील कायदा आणि सुव्यवस्था कोणीही हातात घेऊ नये,अशीही भूमिका विद्यापीठाने स्पष्ट केली आहे.त्याचाप्रमाणे या प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापना केली असल्याचे कळवले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये २ फेब्रुवारी रोजी सायकांळी ०६.३० दरम्यान विभागाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परिक्षेचा भाग म्हणून प्रायोगिक नाटकाचे सादरीकरण केले जात होते. सदर नाटकाच्या सादरीकरणातील काही आशय / वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दिसून येत आहे. या विषयी विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन काही हातापाई झाल्याचे समजले. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यांनतर पोलिस पाचारण करुन त्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे,असे या प्रकतानात नमूद केले आहे.

या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याबाबत विद्यापीठाकडे विविध संघटनांकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे तसेच ऐतिहासिक व्यक्तीचे विडंबन करणे हे पूर्णतः गैर असून निषेधार्ह आहे. विद्यापीठ अशा कोणत्याही गोष्टीचे समर्थन करीत नाही. यामध्ये सदर प्रकरणी विद्यापीठाने सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठित केली आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात विहित नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.