डी.वाय.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

गुरुवारी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नाष्टामधून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नाष्ट्यातून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती.

डी.वाय.पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डी.वाय.पाटील प्राथमिक शाळेतील (DY PATIL PRIMARY SCHOOL)सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणीतून विषबाधा (Food poisoning)झाल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवड परिसरातील शाहूनगर येथील डी.वाय.पाटील शाळेतील (DY Patil School at Shahunagar)विद्यार्थ्यांना गुरुवारी नाष्टा म्हणून दिलेल्या अन्नपदार्थामुळे उलट्या, मळमळीचा त्रास झाला. त्यामुळे 28 विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. या घटनेमुळे शाळा प्रशासनाने पालकांची माफी मागितली आहे.

गुरुवारी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या नाष्टामधून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नाष्ट्यातून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती.  परंतु हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलटी पोट दुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. कमी त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ पालकांबरोबर घरी सोडण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायंकाळी प्रकृती सुधारल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान,  गुरुवारी शाळेत झालेल्या अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्या प्रकरणे शाळेचे संचालक अभय कोटकर यांनी पालकांची माफी मागितली आहे. तसेच नाष्टा पुरविणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. विश्वाचा झालेल्या घटनेबाबत अन्न निरीक्षकांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात आहे.