MPSC : ‘गट ब’ व ‘गट क’ परीक्षेतील जागा वाढणार का?; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
विविध शासकीय विभागामध्ये रिक्त जागा असताना सुद्धा त्या पदांची जाहिरात काढण्यात न आल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त केली जात असून ‘गट ब’ व ‘गट क’ परीक्षेतील जागा वाढवण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ‘गट ब’ येत्या पाच जानेवारीला घेतली जाणार आहे. तर ‘गट क’ साठी २ फेब्रुवारीला परीक्षा असल्याची जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. विविध शासकीय विभागामध्ये रिक्त जागा असताना सुद्धा त्या पदांची जाहिरात काढण्यात न आल्याने विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त केली जात असून ‘गट ब’ व ‘गट क’ परीक्षेतील जागा वाढवण्याची (Increase seats in 'Group B' and 'Group C' exams) मागणी उमेदवारांकडून केली जात आहे
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. परंतु शासनाने काढलेल्या भरतीच्या जागा खूप कमी आहेत. त्यामुळे शासनाने उर्वरित रिक्त पदांची जाहिरात तत्काळ काढावी, अशी मागणी आता विद्यार्थ्यांमधून जोर धरत आहे. या दोन्ही गटांमधील १ हजार ८११ पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. ‘गट ब’साठी १ हजार ३३३ व ‘गट क’साठी ४७८ पदांसाठी ‘एमपीएससी’ मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - उद्योग निरीक्षक - ३९ पदे, कर सहायक - ४८२ पदे, तांत्रिक सहायक - ९ पदे, बेलिफ, लिपिक, गट-क, मुंबई कार्यालय - १७ पदे, लिपिक-टंकलेखक - ७८६ पदे अशा एकूण १ हजार ३३३ जागा आहेत. गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - विविध मंत्रालयातील प्रशासकीय विभाग - ५४ पदे एमपीएससी - १ पद, राज्य कर निरीक्षक - २०९ पदे, पोलिस उपनिरीक्षक - २१६ पदे, असे एकूण ४८० पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
________________________________
सामान्य प्रशासन विभागाकडून आयोगाकडे जेवढ्या जागांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे. तेवढ्याचं जागांसाठी आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क व सहायक मोटार वाहन निरीक्षक या संवर्गासाठी एकही पद दिले नाही. सामान्य प्रशासन विभागाने वाढीव जागांचे सुधारीत मागणी पत्र आयोगाकडे सादर केल्यास जागा वाढ होऊ शकते .
महेश घरबुडे, (अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन)
________________________________
राज्यातील लाखो उमेदवार स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. मात्र आयोगाकडून गट 'क' आणि गट 'ब' दोन्ही साठी एकुण १ हजार ८११ पदांसाठी तुटपुंजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सध्या आचारसंहिता असल्याचे काही करता येणार नाही. मात्र, आमची मागणी आहे पोलीस उपनिरीक्षक आणि लिपिक टंकलेखन या दोन्ही पदांच्या मिळून ६ हजार पेक्षा अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवावी.
महेश बडे, MPSC Students Rights, प्रतिनिधी