CBSE 10 वी, 12 वी च्या निकालाची बनावट नोटीस व्हायरल 

CBSE ने अद्याप निकाल जाहीर करण्याच्या तारखेबाबत कोणतीही माहिती प्रसिध्द केलेली नाही.

CBSE 10 वी, 12 वी च्या निकालाची बनावट नोटीस व्हायरल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या सोशल मीडियावर एक नोटीस वेगाने फिरत आहे. ज्यामध्ये दहावी आणि बारावीचे निकाल (10th and 12th results)आज म्हणजेच 1 मे रोजी दुपारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ही नोटीस बनावट असून, विद्यार्थ्यांनी त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये, असा इशारा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( CBSE) ने दिला आहे. 

CBSE ने अद्याप निकाल जाहीर करण्याच्या तारखेबाबत कोणतीही माहिती प्रसिध्द केलेली नाही. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची दिशाभूल केली जात असल्याचे उघड झाले आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार  यासंदर्भात सीबीएसई अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, "  सीबीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळ याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये."

CBSE बोर्डाच्या निकालासाठी किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, फक्त केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या results.cbse.nic.in, cbse.gov.in, cbseresults.nic.in. या  अधिकृत वेबसाइटवर विश्वास ठेवा.  निकाल जाहीर झाल्यानंतर यापैकी कोणत्याही वेबसाइटवर तो तपासता येईल.
याशिवाय उमेदवार डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात. यासाठी तुम्हाला digilocker.gov.in वर जावे लागेल.