आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेशात ८४.३० टक्के जागा भरल्या; २,१५८ जागा रिक्त
राज्यातील २०४ महाविद्यालयांमधील एकूण १३ हजार ७५० जागांपैकी ११ हजार ५९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, अद्याप २ हजार १५८ जागा रिक्त आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत तिसऱ्या फेरीअखेर एकूण ८४.३० टक्के जागा भरल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राबविण्यात आलेल्या बीएएमएस (आयुर्वेद), बीएचएमएस (होमिओपॅथी) आणि बीयूएमएस (युनानी) या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. राज्यातील २०४ महाविद्यालयांमधील एकूण १३ हजार ७५० जागांपैकी ११ हजार ५९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, अद्याप २ हजार १५८ जागा रिक्त आहेत.
तिसऱ्या फेरीअखेर बीयूएमएस अभ्यासक्रमाचा प्रवेशाचा टक्का सर्वाधिक ९२.९९ इतका असून, बीएएमएसचे ८७.६२ टक्के आणि बीएचएमएसचे ७५.६९ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत.
बीएएमएसच्या १,१५१ जागा रिक्त
राज्यातील १३९ आयुर्वेद महाविद्यालयांमधील बीएएमएसच्या एकूण ९ हजार ३०३ जागांपैकी ८ हजार १५२ जागांवर प्रवेश झाले आहेत. प्रवेशाची टक्केवारी ८७.६२ असून, १ हजार १५१ जागा रिक्त आहेत.
यामध्ये २३ शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील १ हजार ६७२ जागांपैकी १ हजार ५४७ जागांवर प्रवेश झाले आहेत. शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे प्रमाण ९२.५२ टक्के असून, १२५ जागा रिक्त आहेत. तर ११६ खासगी महाविद्यालयांतील ७ हजार ६३१ जागांपैकी ६ हजार ६०५ जागा भरल्या असून, १ हजार २६ जागा रिक्त आहेत. खासगी महाविद्यालयांतील प्रवेशाचे प्रमाण ८६.५५ टक्के आहे.
बीएचएमएसच्या ९७७ जागा रिक्त
होमिओपॅथी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यातील ५७ महाविद्यालयांमध्ये ४ हजार १९ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ३ हजार ४२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशाचे प्रमाण ७५.६९ टक्के आहे. अद्याप ९७७ जागा रिक्त आहेत.
यामध्ये दोन शासकीय महाविद्यालयांतील १३९ जागांपैकी १०९ जागा भरल्या असून, ३० जागा रिक्त आहेत. शासकीय महाविद्यालयांतील प्रवेशाचे प्रमाण ७८.४१ टक्के आहे. तर ५५ खासगी महाविद्यालयांतील ३ हजार ८८० जागांपैकी २ हजार ९३३ जागांवर प्रवेश झाले असून, ९४७ जागा रिक्त आहेत. खासगी महाविद्यालयांतील प्रवेशाचे प्रमाण ७५.५९ टक्के आहे.
बीयूएमएसमध्ये ९२.९९ टक्के प्रवेश
युनानी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सर्वाधिक ९२.९९ टक्के प्रवेश झाले आहेत. राज्यातील आठ युनानी महाविद्यालयांमधील ४२८ जागांपैकी ३९८ जागा भरल्या असून, केवळ ३० जागा रिक्त आहेत.
यामध्ये तीन शासकीय महाविद्यालयांतील १५३ जागांपैकी १५२ जागांवर प्रवेश झाले आहेत. शासकीय महाविद्यालयांतील प्रवेशाचे प्रमाण ९९.३४ टक्के असून, केवळ एक जागा रिक्त आहे. तर पाच खासगी महाविद्यालयांतील २७५ जागांपैकी २४६ जागा भरल्या असून, २९ जागा रिक्त आहेत. खासगी महाविद्यालयांतील प्रवेशाचे प्रमाण ८९.४५ टक्के आहे.
नवीन शासकीय महाविद्यालयामुळे विशेष कॅप राउंड-४
दरम्यान, बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विशेष कॅप राउंड-४ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गट-बमधील अभ्यासक्रमांच्या तीन केंद्रीय प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, बुलढाणा येथील नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला (GAC Buldhana) प्रथमच सक्षम प्राधिकरणाकडून प्रवेशासाठी परवानगी मिळाली आहे.
या नव्या महाविद्यालयाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रे व्हॅकन्सी राउंडमध्ये बदल करण्याची तरतूद नसल्याने उच्च गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना या शासकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळण्यासाठी स्ट्रे व्हॅकन्सी राउंडपूर्वी विशेष कॅप फेरी-४ घेण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरणाने राज्य शासनाच्या परवानगीनंतर घेतला आहे.
जाहीर वेळापत्रकानुसार, विद्यार्थ्यांना ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विशेष कॅप फेरी-४ साठी ऑनलाइन पसंतीक्रम भरता येणार आहेत. या फेरीची निवड यादी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे रिक्त जागांवर प्रवेश मिळविण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष आता विशेष कॅप राउंड-४ कडे लागले आहे.
तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील बीएएमएस, बीएचएमएस आणि बीयूएमएस या तीन आयुष वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण १३ हजार ७५० जागांपैकी ११ हजार ५९२ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, प्रवेशाचे एकूण प्रमाण ८४.३० टक्के झाले आहे. यामध्ये बीएएमएसच्या ९ हजार ३०३ जागांपैकी ८ हजार १५२ जागा भरल्या असून, १ हजार १५१ जागा रिक्त आहेत. बीएचएमएसच्या ४ हजार १९ जागांपैकी ३ हजार ४२ जागांवर प्रवेश झाले असून, ९७७ जागा रिक्त आहेत. तर बीयूएमएसच्या ४२८ जागांपैकी ३९८ जागा भरल्या असून, ३० जागा रिक्त आहेत. अभ्यासक्रमनिहाय प्रवेशाचा विचार करता बीयूएमएसमध्ये सर्वाधिक ९२.९९ टक्के, बीएएमएसमध्ये ८७.६२ टक्के, तर बीएचएमएसमध्ये ७५.६९ टक्के प्रवेश झाले आहेत. तिन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून अद्याप २ हजार १५८ जागा रिक्त आहेत.