दुसरी ते आठवीच्या PAT-2 परीक्षेचे वेळापत्रक बदलले; नवीन वेळापत्रक जाहीर
राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-2) च्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) यापूर्वी नोव्हेंबर २०२६ च्या अखेरीस घेण्याचे ठरवले होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-2) च्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) यापूर्वी नोव्हेंबर २०२६ च्या अखेरीस घेण्याचे ठरवले होते. आता सुधारित वेळापत्रकानुसार ही चाचणी २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ या तीन दिवसांत राज्यभर घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना या बदलाची नोंद घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही परीक्षा एकूण दहा माध्यमांमध्ये होणार असून प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांवर आधारित असेल.
२ डिसेंबरला सर्व माध्यमांच्या प्रथम भाषा विषयाची लेखी व तोंडी परीक्षा होईल. ३ डिसेंबरला गणिताची परीक्षा आणि ५ डिसेंबरला तृतीय भाषा (इंग्रजी) ची परीक्षा घेतली जाईल. शाळांना स्थानिक सत्रानुसार सकाळ किंवा दुपारच्या सत्रात वेळ ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. लेखी परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी वैयक्तिक स्वरूपात तोंडी परीक्षा घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थी संख्या जास्त असल्यास ती दुसऱ्या दिवशीही घेता येईल. ही परीक्षा दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेसारखी नसल्याने विद्यार्थी व पालकांनी अतिरिक्त ताण घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या चाचणीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीचे मूल्यांकन करणे आणि त्यानुसार अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे हा आहे. जुन्या ‘अध्ययनाचे मूल्यमापन’ या संकल्पनेकडून ‘अध्ययनासाठी मूल्यमापन’ या प्रभावी तत्त्वाकडे वाटचाल करणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणातील (NAS) राज्याची गुणवत्ता उंचावणे तसेच मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कृती कार्यक्रम व उपचारात्मक उपाययोजना राबवणे या बाबींवर भर देण्यात आला आहे. यामुळे शिक्षणप्रक्रियेत अधिक प्रभावी बदल घडवून आणता येतील.
विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार राज्य स्तरावरून थेट तालुक्यांपर्यंत प्रश्नपत्रिकांचे गठे पोहोचवले जातील. चाचणी पत्रिकांच्या सुरक्षिततेची व गोपनीयतेची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी आणि तालुका समन्वयकांची असेल. प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणे किंवा गोपनीयतेचा भंग होईल असे गैरप्रकार टाळण्यासाठी कडक निर्देश देण्यात आले आहेत. शाळांनी स्वतःहून प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स काढून वाटप करू नये, अन्यथा त्याचा खर्च शासनाकडून अदा केला जाणार नाही.
चाचणी संपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी SCERT च्या अधिकृत वेबसाइटवर उत्तरसूची उपलब्ध होईल. त्या आधारे शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) पोर्टलवर आणि चॅटबॉट्सवर भरण्यात येतील. या गुणांवरून कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची किंवा दंडात्मक कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे व पारदर्शक पद्धतीने चाचण्या घेऊन अचूक गुणदान करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा समजून योग्य सुधारणा करता येतील.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शाळा भेटींच्या नियोजनासाठी १०० टक्के शाळांमध्ये निरीक्षणाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे चाचणी अधिक सुव्यवस्थित व विश्वासार्ह होईल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.