रेल्वेत नोकरीची मोठी संधी; विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण १९१ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वपूर्ण भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) मिनिस्टीरियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण १९१ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही भरती सेंट्रलाइज्ड एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशननुसार काढण्यात आली असून अधिकृत अधिसूचना ५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आली. इच्छुक उमेदवार रेल्वे भर्ती बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत ४ डिसेंबर २०२६ आहे. शुल्क भरण्यासाठी ६ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
या भरतीत विविध क्षेत्रांतील पदांचा समावेश असल्याने अनेक पात्रताधारकांना संधी मिळणार आहे. सर्वाधिक ७९ पदे ज्युनियर ट्रान्सलेटर (हिंदी) या पदासाठी आहेत. लॅब असिस्टंट ग्रेड III साठी ३६, स्टाफ अँड वेल्फेअर इन्स्पेक्टरसाठी २७, पब्लिक प्रॉसिक्युटरसाठी २१, चीफ लॉ असिस्टंटसाठी १७, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टरसाठी ८ आणि सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग) साठी ३ पदे उपलब्ध आहेत. अशाप्रकारे एकूण सात श्रेणींमधील १९१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. हिंदी भाषांतर, कायदा, प्रयोगशाळा, कर्मचारी कल्याण आणि प्रसिद्धी यांसारख्या क्षेत्रांतील उमेदवारांना याचा फायदा होईल.

शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, मात्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय आवश्यक आहेत. इतर काही पदांसाठी पदव्युत्तर पदवी, संबंधित व्यावसायिक डिप्लोमा किंवा अनुभव अनिवार्य आहे. पब्लिक प्रॉसिक्युटर पदासाठी एलएलबी पदवीसोबत किमान पाच वर्षांचा वकिलीचा अनुभव आवश्यक ठेवण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित पदाच्या पात्रतेची अधिकृत नोटिफिकेशनमध्ये तपासणी करणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा पदानुसार १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली असून वयाची गणना १ जानेवारी २०२७ रोजीच्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रवर्गानुसार आणि पदानुसार वयोमर्यादा तपासून घ्यावी. निवड प्रक्रिया संगणक आधारित चाचणीसह इतर टप्प्यांद्वारे होईल.
अर्ज शुल्क सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ५०० रुपये तर अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी २५० रुपये आहे. स्टेज-१ सीबीटी परीक्षेत सहभागी होणाऱ्या पात्र उमेदवारांना शुल्क परत मिळेल. सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस वर्गाला ४०० रुपये तर इतरांना पूर्ण २५० रुपये परत केले जातील.