यूपीएससी मुख्य परीक्षा २०२६ निकाल जाहीर; २५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या एकूण १३ हजार ३४३ उमेदवारांपैकी २ हजार ५२६ जणांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच व्यक्तिगत चाचणी किंवा मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

यूपीएससी मुख्य परीक्षा २०२६ निकाल जाहीर; २५२६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. या परीक्षेत सहभागी झालेल्या एकूण १३ हजार ३४३ उमेदवारांपैकी २ हजार ५२६ जणांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच व्यक्तिगत चाचणी किंवा मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. मुख्य परीक्षेत बसलेल्या उमेदवारांपैकी सुमारे १८.९३ टक्के उमेदवारच या टप्प्यात पोहोचू शकले आहेत. दर पाच उमेदवारांमागे एका उमेदवाराला मुलाखतीची संधी मिळाली आहे. यशस्वी उमेदवार आता भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा तसेच इतर केंद्रीय सेवांच्या ग्रुप ए आणि ग्रुप बी पदांसाठीच्या निवड प्रक्रियेत सहभागी होतील.

मुलाखत हा निवड प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यंदा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर १३ हजार ३४३ उमेदवारांनी लेखी मुख्य परीक्षेत स्थान मिळवले होते. आता त्यापैकी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीत आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. मुलाखतीच्या तारखांची घोषणा आयोगाकडून स्वतंत्रपणे केली जाईल. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल तपासून पहावा. निकालाच्या यादीत मुलाखतीसाठी निवड झालेल्यांची नावे आणि रोल नंबर देण्यात आले आहेत.

पात्र ठरलेल्या उमेदवारांसमोर आता दोन महत्त्वाची कामं आहेत. एक म्हणजे मुलाखतीची तयारी आणि दुसरे म्हणजे ऑनलाइन अर्जात आवश्यक माहिती भरणे किंवा अपडेट करणे. यासाठी आयोगाने ११ नोव्हेंबर २०२६ ते २५ नोव्हेंबर २०२६ सायंकाळी सहा वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे. ही प्रक्रिया सर्व यशस्वी उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. पोर्टलवर लॉगिन करून माहिती तपासणे आणि फॉर्म अंतिम स्वरूपात सबमिट करणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांनी आधीच कागदपत्रे आणि माहिती अपलोड केली आहे आणि त्यांना काहीही बदलायचे नाही, त्यांनाही पोर्टलवर जाऊन फॉर्म सबमिट करावा लागेल. असे न केल्यास त्यांचे ई-समन लेटर म्हणजेच मुलाखतीचे प्रवेशपत्र जारी केले जाणार नाही. पूर्व परीक्षेच्या अर्जात शैक्षणिक पात्रता ‘अॅपियरिंग’ दर्शविलेल्या उमेदवारांना आता उत्तीर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल. संबंधित माहिती अपडेट करून कागदपत्रे अपलोड करावी लागतील. अन्यथा उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे.

ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास मुलाखतीसाठी प्रवेश मिळणार नाही. उमेदवारांनी वेळेवर पोर्टल वापरून सर्व माहिती अचूक भरावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याने यूपीएससी २०२६ ची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये उत्साह आणि चिंता दोन्ही दिसून येत आहेत. निवड झालेल्यांना आता मुलाखतीच्या तयारीसोबतच प्रशासकीय जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी लागेल.

या वर्षी मुख्य परीक्षेतून मुलाखतीपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण कमी राहिले आहे. तरीही पात्र उमेदवारांना ही मोठी संधी आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर नियमित तपासणी करून सर्व अटींचे पालन करणे गरजेचे आहे. मुलाखतीत यश मिळवून इच्छित सेवेत प्रवेश मिळवणे हे आता या उमेदवारांचे मुख्य लक्ष्य असेल.