शासनाचे नवे स्पष्टीकरण: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी NET/SET/SLET किंवा Ph.D. अनिवार्य
सहाय्यक प्राध्यापक पदासाठी NET/SET/SLET किंवा पीएच.डी. ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव प्रताप लुबाळ यांनी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर राज्य सरकारने पुन्हा एकदा दूर केला आहे. दोन दिवसात पुन्हा नवे पत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी NET/SET/SLET किंवा पीएच.डी. ही शैक्षणिक अर्हता ग्राह्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव प्रताप लुबाळ यांनी पत्राद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) १८ जुलै २०१८ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील परिच्छेद ३.१० नुसार, विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी १ जुलै २०२१ पासून पीएच.डी. पदवी अनिवार्य करण्यात आली होती. ही अधिसूचना महाराष्ट्रात ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आली होती. त्यामध्ये संबंधित तरतूद परिच्छेद ४.१० मध्ये समाविष्ट करण्यात आली होती.
दरम्यान, विद्यापीठ अनुदान आयोगाने ३० जून २०२३ रोजी अधिसूचना काढून या तरतुदीत महत्त्वाची सुधारणा केली. त्यानुसार सर्व उच्च शिक्षण संस्थांमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी NET/SET/SLET ही किमान पात्रता असेल, असे स्पष्ट करण्यात आले. या सुधारणेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनाने ५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे केली. मात्र, या शासन निर्णयात २०१९ च्या शासन निर्णयातील नेमका कोणता परिच्छेद सुधारित करण्यात आला आहे, याचा उल्लेख नसल्याने उमेदवार आणि शैक्षणिक क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर शासनाने आता स्पष्ट केले आहे की, ५ मार्च २०२४ रोजी करण्यात आलेली सुधारणा ही ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ४.१० संदर्भात आहे. त्यामुळे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी NET/SET/SLET ही किमान पात्रता असल्याचे स्पष्ट होते. मात्र, त्यात काही त्रुटी राहून गेल्या होत्या.
मात्र, याच ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ५.१ (1) (A) (२) मध्ये NET किंवा SET उत्तीर्ण उमेदवारांबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २००९ किंवा २०१६ च्या पीएच.डी. नियमांनुसार पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना NET/SET मधून सूट देण्याची तरतूद नमूद आहे.
या दोन्ही तरतुदींचा एकत्रित विचार करून शासनाने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी NET/SET/SLET किंवा पीएच.डी. ही शैक्षणिक अर्हता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या या स्पष्टीकरणामुळे सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी पीएच.डी. अनिवार्य असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, संबंधित नियमांनुसार पात्रता निश्चित करण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. या निर्णयामुळे NET/SET उत्तीर्ण उमेदवारांसह यूजीसीच्या निर्धारित नियमांनुसार पीएच.डी. प्राप्त केलेल्या उमेदवारांनाही दिलासा मिळाला आहे.