खासगी विद्यापाठींना अभ्यासक्रम सुरू करण्यास मोकळीक; AICTE च्या मान्यतेची गरज नाही; युजीसीचा निर्णय

 राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यासाठी एआयसीटीईची परवानगी घेणे बंधनकारक नाही.

खासगी विद्यापाठींना अभ्यासक्रम सुरू करण्यास मोकळीक; AICTE च्या मान्यतेची गरज नाही; युजीसीचा निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

व्यवस्थापन, संगणक उपयोजन आणि ट्रॅव्हल टुरिझम (Management, Computer Applications and Travel Tourism) विषयातील पदवी, पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (Degree, Post Graduate and Post Graduate Diploma Courses) ऑनलाईन पद्धतीने राबवण्याची मोकळीक देशातील सर्व खाजगी विद्यापीठांना  (Freedom to operate private universities) देण्यात आली आहे. पुढील काळात वरील अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय  तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) परवानगी गरज लागणार नाही, असा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) घेतला आहे. 

युजीसीने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. यूजीसी नियमावली २०२० नुसार दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीकडे अर्ज करण्यापूर्वी संबंधित नियामक संस्थेची मान्यता, शिफारस घेणे बंधनकारक होते. मात्र, आता  राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांनी तंत्रशिक्षण अभ्यासक्रम राबवण्यासाठी एआयसीटीईची परवानगी घेणे बंधनकारक नाही, असे युजीसीने म्हटले आहे.

राज्य, केंद्रीय आणि खासगी विद्यापीठांना मोकळीक मिळाली असली, तरी अभिमत विद्यापीठांची नियमातून सुटका झालेली नाही. दूरस्थ आणि ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी यूजीसीकडे अर्ज करण्यापूर्वी अभिमत विद्यापीठांना एआयसीटीईची मान्यता, नाहरकत पत्र, शिफारस घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.