परदेशातील शिक्षणासाठी 90 टक्के पालक इच्छुक; 'HSBC - क्वालिटी ऑफ लाइफ रिपोर्ट'

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53 टक्के भारतीय पालकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलांना बाहेर शिक्षण देण्यासाठी बचत योजना आहे. अभ्यासासाठी, 40 टक्के विद्यार्थी कर्जावर आणि 51 टक्के शिष्यवृत्तीवर अवलंबून आहेत. तर 27 टक्के पालक असे आहेत जे, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपली मालमत्ता विकण्यास तयार आहेत.

परदेशातील शिक्षणासाठी 90 टक्के पालक इच्छुक; 'HSBC - क्वालिटी ऑफ लाइफ रिपोर्ट'

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या भारतात उच्च शिक्षणाचे महत्व (Importance of Higher Education in India) वाढले आहे. त्यातही आपल्या पाल्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे (Go abroad and get higher education), अशी इच्छा बाळगणार्‍या पालकांचीही (parents) संख्या मोठी आहे. आपल्या मुलांना परदेशात शिक्षण देण्यासाठी आणि त्यांना तिथेच स्थायिक करण्यासाठी आयुष्यभर साठवलेले पैसे, सेवानिवृत्तीचे पैसेदेखील खर्च करायला पालक तयार आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात (In the survey) ही बाब समोर आली आहे.

ब्रिटीश बँक HSBC ने अलीकडेच 'HSBC - क्वालिटी ऑफ लाइफ रिपोर्ट 2024' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवाल तयार करण्यासाठी, जगभरातील 11 हजार पालकांशी बोलण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान भारतीय पालकांचे मतही घेण्यात आले. यापैकी 90 टक्के भारतीय पालकांनी त्यांच्या पाल्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. 

या अहवालात असे म्हटले आहे की, सर्वेक्षण केलेल्या 78 टक्के भारतीयांचे किमान एक मूल परदेशात शिकत आहे किंवा त्यांना त्यांच्या मुलाला देशाबाहेर शिक्षणासाठी पाठवायचे आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारखे देश अभ्यासासाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.

मात्र, परदेशात राहण्याचा वाढता खर्च आणि वाढती महागाई यामुळे पालकांना आपल्या पाल्यांना देशाबाहेर शिक्षण देणे कठीण होत आहे. पालक केवळ त्यांच्या वैयक्तिक बचतीची गुंतवणूक करत नाहीत तर त्यांच्या सेवानिवृत्ती निधीचा वापर करून त्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण देतात. अहवालानुसार, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 53 टक्के भारतीय पालकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलांना बाहेर शिक्षण देण्यासाठी बचत योजना आहे. अभ्यासासाठी, 40 टक्के विद्यार्थी कर्जावर आणि 51 टक्के शिष्यवृत्तीवर अवलंबून आहेत. तर 27 टक्के पालक असे आहेत जे, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपली मालमत्ता विकण्यास तयार आहेत.