संघर्षाला सहयोगामध्ये परावर्तित करा ; श्री.श्री. रवीशंकर

संघर्षाला सहयोगामध्ये परावर्तित करा  ; श्री.श्री. रवीशंकर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

छोट्या छोट्या गोष्टींमुळे माणसांची मने दुखवली जात असून त्यातून संघर्ष निर्माण होत आहे.मात्र, प्रत्येक संघर्षाला संवादामध्ये आणि संवादाला सहयोगामध्ये परावर्तित करता येऊ शकते. खरे शिक्षण तेच आहे, जे संघर्षाला सहयोगामध्ये परावर्तित करते. आपल्या देशाने खूप संघर्ष केला आहे. परंतु प्रत्येक संघर्ष आणि क्रांतीमध्ये देशाने शांतीचा मार्ग सोडला नाही, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)आयोजित कार्यक्रमात आध्यात्मिक गुरू श्री.श्री रवीशंकर (shree shree Ravi Shankar)यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात श्री. श्री. रविशंकर यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना अमृत गौरव विशेष सन्मान पुरस्कार  प्रदान करण्यात आला.तसेच उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक,ॲड.उज्वल निकम, उद्योजक मिलिंद कांबळे, कृ‍षिरत्न अनिल मेहेर, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदानासाठी सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख, शैक्षणिक,सामाजिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कृष्णकुमार गोयल, प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे आणि हेमंत हरिभाऊ धात्रक यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री.श्री रवीशंकर म्हणाले, आपल्या शिक्षणाचा स्तर खाली जाऊ नये याची खूप मोठी जबाबदारी शिक्षकांवर आहे. तसेच विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्यापासून व्यसनांच्या आहारी जाण्यापासून थांबवावे लागेल.सर्व अनुचित प्रकारांना थांबवण्यासाठी आणि युवकांना योग्य मार्गावर घेऊन जात देशाला प्रगतिशील बनवण्यासाठी समाजातील चांगल्या व्यक्तींची आवश्यकता आहे.तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाता असून त्यामुळे अनावश्यक गोष्टींना बाजूला गेल्या आहेत. तसेच काळ सुसंगत व आवश्यक असणाऱ्या गरजा विचारात घेऊन नवनवीन अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. त्यातून व्यक्तीच्या व्यक्तीत्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.ही चांगली बाब आहे. 

प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 1954 मध्ये बी.ए.ची डिग्री, त्यानंतर एम. ए.ची डिग्री आणि मुंबई विद्यापीठातून लॉ ची डिग्री घेतली.मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे याचाही मला अभिमान आहे. मी निश्चितपणे सांगू शकते की शिक्षण हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. शिक्षणामुळे सदगुणांचा गुणाकार झाला पाहिजे आणि दुर्गुणांची वजाबाकी झाली पाहिजे.हाच खरा शिक्षणाचा उद्देश आहे.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वोच्च मानांकन विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाबरोबर करार करून शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय करण्यावर भर दिला जात आहे.