विद्यापीठ अधिसभा सदस्यांमध्ये उभी फुट ; विकास कामे सोडून श्रेयवादाचे राजकारण

विकासाऐवजी अनेक अधिसभा सदस्य श्रेय वादाची लढाई लढात असल्याचे पाहायला मिळाले.

विद्यापीठ अधिसभा सदस्यांमध्ये उभी फुट ; विकास कामे सोडून श्रेयवादाचे राजकारण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)आधिसभेच्या बैठकीत शनिवारी नाशिक जिल्ह्यातील अधिसभा (senate)सदस्यांमध्ये उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. नाशिक उपकेंद्राच्या विकासासाठी पाठपुरावा करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्यावर हक्क भंग आणाला गेला ; त्यावेळी नाशिकच्या काही अधिसभा सदस्यांनी याचे राजकारण करत एक प्रकारे नाशिकच्या उपकेंद्राच्या उभारणी विरोध भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे विकासाऐवजी अनेक अधिसभा सदस्य श्रेय वादाची लढाई लढात असल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक जिल्ह्यातील एका  व्यवस्थापन परिषद व अधिसभा सदस्य असलेल्या सडस्यावर शनिवारी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, त्यास विरोध करायचे सोडून नाशिक जिल्ह्यातील काही अधिसभा सदस्य आपल्याच जिल्ह्यातील सदस्याविरोधात दंड थोपटून उभे राहिले. नाशिक उपकेंद्राचा निधी कमी करा,असे म्हटल्यावरही या सदस्यांनी विरोधी भूमिका सोडली नाही.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कुलगुरूंवर टीका करणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्यावर या आप्त सहकार्यांनीच तोंडसुख घेतले. मात्र,या सगळ्या घटनाक्रमात राजकारणाचा वास येत होता.

अहमदनगर उपकेंद्र पाठोपाठ आता नाशिक उपकेंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू झाले आहे. या उपकेंद्राच्या उभारणीवरून काही सदस्य श्रेय घेत आहेत. याच पोटदुखीतून सभागृहात आरोप प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे एकाच पॅनल मधून निवडून आलेल्या आधिसभा सदस्याने आपल्याच पॅनल मधील  सदस्यावर हक्क भंग आणल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्याने प्रसार माध्यमांशी विद्यापीठाची गोपनीय माहिती सांगू नये म्हणून हा हक्कभंग आणला गेला होता. मात्र, येथे संबंधित व्यवस्थापन परिषदेच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. नाशिक जिल्ह्यातील काही आधिसभा सदस्य आपल्याच सहकार्याविरोधात बोलताना दिसून आले हे सत्य असले तरी याच नाशिक जिल्ह्यातील अभ्यासू व जेष्ठ अधिसभा सदस्यांनी संबंधित व्यवस्थापन परिषद सदस्याच्या बाजूने उभे राहत सभागृहात मत व्यक्त मांडले.

दारम्यान, विद्यापीठातील काही लोकांनी हे सर्व घडवून आणले. संबंधित व्यक्तीला एकटे पाडण्यासाठी हा सर्व डाव रचण्यात आला.हे सर्व पूर्वनियोजित होते ? अशी चर्चा अधिसदस्यांमध्ये रंगल्याचे पाहायला मिळाले,असे असले तरी काय सत्य आणि काय असत्य हे सुज्ञ व्यक्तींना समजले.