शिक्षक भरती शिफारशीनंतरही भाषा, गणित,विज्ञान विषयासह माजी सैनिक,खेळाडूंच्या हजारो जागा रिक्त 

इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी इंग्रजी माध्यम-१५८५, मराठी माध्यम-८७०, उर्दू माध्यम- ६४० जागा व इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी गटातील गणित-विज्ञान- २२३८ जागा रिक्त राहिल्या आहेत.

शिक्षक भरती शिफारशीनंतरही भाषा, गणित,विज्ञान विषयासह माजी सैनिक,खेळाडूंच्या हजारो जागा रिक्त 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रक्रिया राबवली जात असून पात्र उमेदवारांची शिफारस केल्यानंतरही शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त राहत आहेत.शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेल्या आकडेवाडीनुसार एकूण २१ हजार ६७८ पैकी मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ पदे होती. त्यातील ११०८५ उमेदवारांची शिफारस होत आहे तर ५७१७ पदांसाठी शिफारस झालेली नाही.आरक्षणाचा विचार करता माजी सैनिक (१५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे २३५७ जागा व अंशकालीन (१० टक्के) उमेदवार नसल्यामुळे १५३६ जागा तसेच खेळाडू (५ टक्के) उमेदवार नसल्यामुळे ५६८ जागा रिक्त राहिल्या आहेत, असे शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवाडीनुसार भाषा विषयचा विचार करता इयत्ता १ ली ते इयत्ता ५ वी इंग्रजी माध्यम-१५८५, मराठी माध्यम-८७०, उर्दू माध्यम- ६४० जागा व इयत्ता ६ वी ते इयत्ता ८ वी गटातील गणित-विज्ञान- २२३८ जागा रिक्त राहिल्या आहेत. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रमाणात उमदेवार देण्यासाठी व्यवस्थापननिहाय त्यांच्या जाहिरातीतील पदे विचारात घेवून गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.उमेदवार उपलब्ध न झाल्याने पहिल्या राऊंडमध्ये समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दूसरा राऊंड घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय मधील जाहिरातीतील रिक्त जागा भरल्या जातील.

हेही वाचा : शिक्षक भरती मोठी अपडेट: उमेदवार निवडीसाठीची शिफारस झाली; अशी पाहता येणार

मुलाखतीसह या प्रकारातील एकूण ४८७९ जागांची मुलाखतीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही सूरू आहे, १:३ ऐवजी १:१० या प्रमाणात उमेदवार देणेबाबत शासनादेश व न्यायालयीन प्रक्रिया विचारात घेता यथोचितरित्या प्रक्रिया करण्यात येईल.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक ७६२३/२०२३ मध्ये खाजगी संस्थांना महाराष्ट्र खाजगी शाळा नियमावली १९८१ च्या प्रचलित तरतूदीनुसार १:१० या प्रमाणे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी देण्याबाबत निर्देश दिले आहेत.त्यानुसार शासन पत्र दिनांक २१/०२/२०२४ अन्वये नियमावलीमध्ये सुधारणा होईपर्यंत १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या ११८९ संस्थांना ४८७९ रिक्त पदासाठी योग्य ती प्रक्रिया करून १:१० या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करुन दिले जातील.मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी १:१ या प्रकारात निवडलेले उमेदवार वगळून अन्य उमेदवारांमधून मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे.मुलाखत व अध्यापन कौशल्य याच्या आधारे निवड केली जाईल, यासाठी ३० गुणांची तरतुद केली असून उमेदवाराची निवड संस्था करणार आहे.

गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी राज्यस्तरावरुन वेळापत्रक ठरवून दिले जाईल, त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांचेस्तरावर योग्य ते वेळापत्रक तयार वेळापत्रक पदस्थापनेपर्यंतची कार्यवाही केली जाईल.उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची पडताळणी केली जाईल व पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार समूपदेशन पध्दतीने नियुक्ती आदेश दिले जातील, त्यामध्ये दिव्यांग व महिलांना प्राधान्य दिले जाईल. मुळ कागदपत्राची पडताळणी करुन नियुक्ती देण्यास पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही केली जाईल. काही उमेदवारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचेकडून कागदपत्राची आवश्यक ती पडताळणी करणे गरजेचे आहे, अशा उमेदवारांना योग्य त्या पडताळणीनंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारीस्तरावर केली जाईल,असेही शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.