विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: नवीन वर्षापासून कमवा व शिका मानधन प्रतितास ५५ रुपये

विद्यार्थ्यांना 45 रुपये प्रतितास ऐवजी आता 55 रुपये प्रतितास एवढे मानधन मिळणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर: नवीन वर्षापासून कमवा व शिका मानधन प्रतितास ५५ रुपये

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) विविध विभागांमध्ये व संलग्न महाविद्यालयांमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेत (Karmaveer Bhaurao Patil Earn and Learn Scheme)सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2024 पासून वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे (Student Development Board) याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे 45 रुपये प्रतितास ऐवजी विद्यार्थ्यांना आता 55 रुपये प्रतितास एवढे मानधन मिळणार आहे.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आधिसभा सदस्यांनी तसेच विविध विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी, याबाबत विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच विद्यापीठाच्या आधिसभेमध्ये सुद्धा काही सदस्यांनी या संदर्भातील ठराव व प्रस्ताव सादर केले होते. त्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मानधन वाढीचा निर्णय केव्हा लागू होणार याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. अखेर 1 जानेवारीपासून मानधन वाढीचा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

----------------------------------

 विद्यापीठ प्रशासनाने कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याचा उद्देश समोर ठेवून काही कामे दिली आहेत. परंतु, आता त्यात सुधारणा केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित कामे दिली जातील. एखाद्या विद्यार्थ्याला कॉम्प्युटरचे काम येत असेल तर त्याला त्या संबंधातील कामे देण्यात येईल तर एखाद्या विद्यार्थ्याला चांगले बाग काम येत असेल तर तो विद्यार्थी बाग काम करेल.

- देविदास वायदंडे,  व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

----------------------------------

विद्यापीठ प्रशासनाने उशिरा का होईना विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील कामवा व  शिका योजनेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानधन वाढ करण्याचा निर्णय घेतला याबद्दल आनंदाचा आहे. परंतु,विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये सुद्धा सुधारणा करावी. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करत असताना काही कौशल्य आत्मसात करता येतील.

- डॉ.सतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे

---------------

विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने गेल्या वर्षभरापासून आम्ही कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ झाली पाहिजे, यासाठी संघर्ष करत होतो ‌. या संघर्षाला आता यश प्राप्त झाले आहे. 

 - राहूल ससाणे, विद्यापाठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती 
--------------