राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पॉलिटेक्निकच्या सत्र परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
अभियांत्रिकी पदविका, औषधनिर्माणशाख पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष वगळता इतर हिवाळी सत्र परीक्षा ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान होणार आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे (एमएसबीटीई) अभियांत्रिकी पदविका, औषधनिर्माणशाख पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष वगळता इतर हिवाळी सत्र परीक्षा ३ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान (Semester exam schedule announced) होणार आहेत. तर, प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक निवडणुकीमुळे बदलण्यात आले असून २१ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षांना सुरवात होणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा २० नोव्हेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, निवडणुकीमुळे त्यात बदल करण्यात आला. २१ नोव्हेंबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. त्यात सुरवातीला द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचे नियोजन असून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन त्यानंतर केले जाणार आहे, असे एमएसबीटीईकडून सांगण्यात आले.
एमएसबीटीईच्या छत्रपती संभाजीनगर विभागात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव हे पाच जिल्हे असे मिळून तेरा जिल्हे विभागाअंतर्गत आहेत. या १३ जिल्ह्यांतून १ लाख ७४ हजार ९२९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून डी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू आहे. विभागात एकूण ५४८ संस्था आहेत. औषधनिर्माण शास्त्र पदविकेचे ३०५, तंत्रनिकेतन १४७ तर अल्प मुदतीचे अभ्यासक्रम असलेल्या ९३ संस्था आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विभागात २२८ परीक्षा केंद्रे आहेत. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एमएसबीटीईकडून भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.