शिक्षक भरती : वय अधिक असणाऱ्या उमेदवारांना भरता येणार प्राधान्यक्रम

प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली असून येत्या ९ फेब्रुवारी  ते १२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये ती सूरू राहील.

शिक्षक भरती : वय अधिक असणाऱ्या उमेदवारांना भरता येणार  प्राधान्यक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षक भरतीस (Teacher Recruitment)पात्र असलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर (Pavitra portal) जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.ही सुविधा येत्या ९ फेब्रुवारी  ते १२ फेब्रुवारी या कालावधीमध्ये सूरू राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.तसेच वयाधिक या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांतील इ. ९ ते १० वी व इ ११ वी ते १२ वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करावी. अशी माहिती शिक्षण विभागातर्फे बुलेटीनद्वारे प्रसिध्द करण्यात आली आहे.

अभियोग्यताधारकांकडून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या “न्युज बुलेटिन "द्वारे उत्तरे देण्यात येत आहेत.अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचविण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्यादृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी. त्यामुळे कार्यालयात गर्दी करु नये तसेच कोणाही अधिकारी ,कर्मचारी अथवा अनाधिकृत व्यक्ती यांना व्यक्तींशः संपर्क करु नये,असेही आवाहन करण्यात आले आहे.

 काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी Alert येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डीलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी.प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही. त्यामुळे प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे,असेही शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.