स्वररंग २०२३ : वाडिया महाविद्यालय विजेते, पृथ्वीराज देशमुख ‘गोल्डन बॉय’ तर संध्या बेलके ‘गोल्डन गर्ल’

विद्यापीठाच्या ‘स्वररंग-२०२३’ युवक महोत्सवाची विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी शनिवारी संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगली होती.

स्वररंग २०२३ : वाडिया महाविद्यालय विजेते, पृथ्वीराज देशमुख ‘गोल्डन बॉय’ तर संध्या बेलके ‘गोल्डन गर्ल’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या (Wadia College) संघाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) ‘स्वररंग-२०२३’ (Swarrang 2023) विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाचे (Youth Festival) सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. वाडिया महाविद्यालयाचा पृथ्वीराज देशमुख हा या महोत्सवाचा ‘गोल्डन बॉय’ (Golden Boy), तर ‘वाडिया’च्याच संध्या बेलके या विद्यार्थिनीने ‘गोल्डन गर्ल’ (Golden Girl) होण्याचा बहुमान पटकावला.   

 


विद्यापीठाच्या ‘स्वररंग-२०२३’ युवक महोत्सवाची विद्यापीठस्तरीय अंतिम फेरी शनिवारी संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगली होती. विद्यापीठातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान सहा विभागस्तरीय युवक महोत्सव आयोजित करण्यात आले होते. त्याआधारे विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी महाविद्यालयीन संघांची निवड करण्यात आली होती.

शाळेशेजारची पानटपरी हटवली म्हणून हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला

 

अमृतवाहिनी महाविद्यालयातील या अंतिम फेरीमध्ये तिन्ही जिल्ह्यांमधील एकूण १ हजार ५६५ विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. त्यांनी संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, ललित आदी मुख्य कलाप्रकारांशी संबंधित २९ विविध कलाप्रकारांमध्ये आपापले वैयक्तिक आणि सांघिक कसब आजमावले. त्याआधारे तज्ज्ञ परीक्षकांच्या संघाने केलेल्या अंतिम निवडीतून या महोत्सवात वाडिया महाविद्यालयाने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारातील एकूण सात पारितोषिकांसह महोत्सवाच्या जेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरल्याचे स्पष्ट झाले.

 

 

नाशिकच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या संघाने एकूण सहा पारितोषिकांसह या महोत्सवाचे उपविजेतेपद पटकावले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले आणि अमृतवाहिनी इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. या स्पर्धेनंतर विद्यापीठातर्फे ‘इंद्रधनुष्य’साठीची संघनिवड चाचणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

 विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांची आवश्यकता असते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘विद्यार्थी विकास’ हे उद्दिष्ट केंद्रवर्ती ठेवून विविध उपक्रमांचे नेहमीच आयोजन केले आहे. त्यातीलच ‘स्वररंग’ हा एक महत्त्वाचा सांस्कृतिक महोत्सव आहे. या महोत्सवामधून आजवर हजारो विद्यार्थी कलाकार घडले आहेत. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची असलेली ओळख यानिमिताने आणखी अधोरेखित होत आहे. पुढील काळात येऊ घातलेल्या इंद्रधनुष्य, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k