SPPU-NCC च्या विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,विद्यार्थी विकास मंडळ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत कळसूबाई गिर्यारोहण आणि सांस्कृतिक आदानप्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय छात्र सैनिकांनी (NCC)महाराष्ट्राचा एव्हरेस्ट अर्थात कळसूबाई शिखर सर केले आणि विद्यापीठाचा झेंडा कळसूबाई शिखरावर फडकावला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,विद्यार्थी विकास मंडळ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत कळसूबाई गिर्यारोहण आणि सांस्कृतिक आदानप्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव समिती अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, संदीप पालवे, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे पाटील, चिंतामण निगळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, वनरक्षक दत्तात्रय पडवळ, शीतल तळकडे, डॉ. सौरभ दहिवळे, डॉ. विवेक कावटकर आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव समिती अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील म्हणाले, कळसूबाई गिर्यारोहणातून आपली शारीरिक क्षमता पडताळहून पाहण्याची संधी आहे. गिर्यारोहण करताना समूहाने चढा. एकमेकांना सहकार्य करा. कळसूबाई, भंडारदरा या परिसराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून कृषी संस्कृतीच्या प्रारंभीच्या पाऊलखुणा इथे सापडतात. या निसर्गरम्य परिसराला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे आणि इथल्या मूळ सौंदर्याला बाधा येत आहे. तरी इथल्या शाश्वत विकासासाठी आपण प्रयत्न करत राहू. विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या उपक्रमासाठी विद्यापीठाचे कायम सहकार्य असेल.
यावेळी प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल कॅडेट एस.यु.ओ. प्रतीक माने, कॅडेट एस.यु.ओ. सूरज थोरात तसेच राज्य प्रजासत्ताक दिनी मुबई येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल ओम थोपटे यांचे सत्कार करण्यात आले. पहिल्या दिवशी सांकृतिक आदान प्रदान कार्यक्रमात विद्यार्थी व स्थानिक कलाकारांनी आदिवासी नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे कळसूबाई शिखरावर गिर्यारोहण करण्यात आले. या गिर्यारोहण शिबिरात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, डॉ. नितीन घोरपडे, संदीप पालवे, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे पाटील, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, श्री.प्रदीप कोळी, श्री मयूर चोरडिया यांनी विद्यार्थ्यांसोबत गिर्यारोहण करत विद्यार्थांना प्रोत्साहन दिले.
या शिबिरात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे १५० कॅडेट्स व ३० प्राध्यापक सहभागी झाले होते.