'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' प्रयोगाला नकार; सोशल मीडियावर संताप

गेली 13 वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व दिल्लीसह इतरत्र 850 हून अधिक प्रयोग झालेले आहेत. 

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' प्रयोगाला नकार; सोशल मीडियावर संताप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University)  'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' (Shivaji Underground in Bhimnagar Mohalla) या नाटकाच्या ठरवलेल्या प्रयोगाला ऐन वेळी परवानगी नाकारून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले, असा आरोप जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Journalist Nikhil Wagle) यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर केला आहे. दरम्यान, हे नाटक रद्द केले नसून पुढे ढकलण्यात आले आहे,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सध्या महात्मा फुले जयंती ते डाॅ. आंबेडकर जयंतीदरम्यान विद्यापीठात महोत्सव सुरू आहे. विद्यापीठातील 'विद्यार्थी विकास मंचा'ने याच महोत्सवात हा प्रयोग आयोजित केला होता. त्यासाठी "विद्यापीठाने परवानगी दिली आहे", असे विद्यार्थी विकास मंचाने आम्हाला 10 दिवसांपूर्वी कळवले होते. त्यानुसार आम्ही निर्माता म्हणून सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या तारखा घेतल्या, प्रवासाची तिकीटे बूक केली आणि काल अचानकच विद्यापीठाच्या समितीने प्रयोगाला परवानगी नाकारली. 

विशेष म्हणजे मागील वर्षी याच नाटकाचा प्रयोग पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात झाला होता. मग याच वर्षी नेमकी काय अडचण आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या सेंसाॅर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेले हे नाटक आहे. गेली 13 वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात व दिल्लीसह इतरत्र 850 हून अधिक प्रयोग झालेले आहेत. 

या नाटकाचे संकल्पक, गीतकार व संगीतकार शाहीर संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे, व दिग्दर्शक नंदू माधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक विचार या नाटकातून मांडलेला आहे आणि तो लोकांनीही स्वीकारला आहे, त्यांनी म्हटले आहे. 

_____________________________________________________

"छत्रपती शिवरायांच्या नावाने जाती-धर्मात द्वेष पसरवू नका", असा स्पष्ट संदेश देणारे हे नाटक पुणे विद्यापीठाने नाकारले आहे याचा अर्थ काय समजावा?

- भगवान मेदनकर (निर्माता, 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला')

----------------------------------------

विद्यापीठात 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' हे नाटक मागील वर्षीच आयोजित केले होते.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.यंदा इतरही काही कार्यक्रमंचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विद्यापीठाने हे नाटक रद्द केलेले नाही तर पुढे ढकलेले आहे. काही कालावधीनंतर या नाटकाचा प्रयोग आयोजित केला जाणार आहे. 

- डॉ. विजय खरे, प्रभारी कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

---------