विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांचे 'पीआरएन' ब्लॉक ; काय आहे नेमके कारण ?

एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्याने आपले पदवी पर्यंतचे  पूर्ण शिक्षण वाया जाणार का ? अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 विद्यापीठाकडून हजारो विद्यार्थ्यांचे 'पीआरएन' ब्लॉक ; काय आहे नेमके कारण ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागाकडून (exam department) तब्बल १२ ते १३ हजार विद्यार्थ्यांचे 'पीआरएन' (Permanent Registration Number- PRN) ब्लॉक करण्यात आले आहेत. त्यामुळे एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण असल्याने आपले पदवी पर्यंतचे  पूर्ण शिक्षण वाया जाणार का ? अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये (student) निर्माण झाली आहे. विद्यापीठाचा परीक्षा अर्ज (Exam form) भरता येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. परंतु, विद्यापीठाकडून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न  केला जात असून विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) मान्यता मिळाली तर हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा : कुलसचिव गहिवरले, कर्मचारी संघटनेचा सिनेटमध्ये गोंधळ

 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी मर्यादित कालावधीत पदवी प्राप्त करणे अपेक्षित आहे.परंतु, दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त न केल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पीआरएन ब्लॉक करण्यात आले आहेत.त्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची संख्या सुमारे ५ ते ७ हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विधी अभ्यासक्रमाच्या पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा मोठी आहे.तसेच कला, वाणिज्य व विज्ञान आदी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे.युजीसीच्या नियमावलीमुळे केवळ एक, किंवा दोन विषयात नापास झाल्याने या विद्यार्थ्यांचे एखादे वर्ष नाही तर पदवी अभ्यासक्रमासाठी घातलेली सर्व वर्षे वाया जाणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत युजीसीच्या N+ (2) नियमावलीवर चर्चा झाली.त्यात काही विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी उपलब्ध करून देऊन दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, अजूनही हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या नियमावलीमूळे परीक्षा देऊ शकता नाही.तसेच विद्यापीठांनी या नियमावलीचे उल्लंघन केल्यास विद्यापीठावर कारवाई होते आणि संबंधित विद्यार्थ्यांची पदवी रद्द होण्याची शक्यता असते.त्यामुळेच विद्यापीठाने यावर युजीसीकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
 समजा जर बीए अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल तर तो  युजीसीच्या नियमावलीप्रमाणे विद्यार्थ्याने पाच वर्षात पूर्ण करणे अपेक्षित आहे.मात्र, विद्यार्थी पाच वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाही तर नियमानुसार विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून त्यांना दोन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देता येऊ शकते.परंतु,त्यापेक्षा अधिक कालावाधी उलटून गेलेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा परीक्षा देता यावी, या दृष्टीने विद्यापीठाकडून युजीसीकडे प्रस्ताव पाठवला जात आहे.त्यास मान्यता मिळाली तर पीआरएन ब्लॉक असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य होणार आहे.मात्र, त्यासाठी सुमारे एक आठवडा वाट पहावी लागणार आहे ,असे विद्यापीठच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.