मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या 

मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. 

मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या देशात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)पार्शवभूमीवर मुंबई विद्यापीठाने (Mumbai University)परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 अंतर्गत 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या (Exams postponed) आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये म्हणजेच 20 मे रोजी मुंबईसहीत महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 20 मे रोजी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नव्हत्या. मात्र निवडणुकीसंदर्भातील नियोजन आणि विद्यापीठाअंतर्गत 20 मे व्यक्तिरिक्त इतर तारखांना मतदान होणाऱ्या मतदानसंघातील जिल्हे येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या बदललेल्या सुधारित तारखांची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या परिपत्रकानुसार 6 मे रेजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता 18 मे रोजी होणार आहेत. तर 7 मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा 25 मे रोजी घेण्यात येणार आहेत. तसेच 13 मे रोजी ज्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. त्या आता थेट 8 जून रोजी होतील. परीक्षांच्या केवळ तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र परीक्षेची वेळ आणि केंद्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विधि महाविद्यालयांच्या, तसेच विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी हे बदलेले वेळापत्रक लागू असेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.