MPSC : मराठा उमेदवारांचे SEBC आरक्षण गायब ? परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थी तणावात, परीक्षेला मुकण्याची भीती !
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पूर्वी मराठा समाजाला EWS आरक्षण लागू होते. मात्र, दरम्यानच्या काळात SEBC आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याने अर्जामध्ये दुरूस्ती करून SEBC प्रवर्ग निवडण्याची संधी देण्यात आली. मात्र, आता मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना या विद्यार्थ्यांना EWS किंवा Uncategorized म्हणजेच खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्याचे दाखवले जात आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) तयारी करणारे मराठा समाजातील हजारो परीक्षार्थी सध्या प्रचंड तणावामध्ये आहेत. कारण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त मुख्य परीक्षेचा (Civil Services Combined Mains Examination) अर्ज भरताना मराठा समाजाला देण्यात आलेले SEBC आरक्षणच गायब झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पूर्वी मराठा समाजाला EWS आरक्षण (EWS Reservation) लागू होते. मात्र, दरम्यानच्या काळात SEBC आरक्षणाची (SEBC Reservation) अंमलबजावणी झाल्याने अर्जामध्ये दुरूस्ती करून SEBC प्रवर्ग निवडण्याची संधी देण्यात आली. मात्र, आता मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना या विद्यार्थ्यांना EWS किंवा Uncategorized म्हणजेच खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्याचे दाखवले जात आहे. म्हणजे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आरक्षणच गायब झाले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अभ्यासापलीकडे आरक्षण, पेपरफुटी, नियुक्त्या, कमी जागांची भरती, तांत्रिक अडचणी अशा अनेक समस्यांचा कायमच सामना करावा लागत आहे. असे असताना राज्यसेवा २०२४ मुख्य परीक्षेसाठी अर्ज करत असलेल्या मराठा समाजातील उमेदवार आरक्षणाच्या कारणामुळे प्रचंड तणावात आहेत. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पूर्वी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी EWS प्रवर्गातून अर्ज केले. मात्र, दरम्यानच्या काळात मराठा समाजाला SEBC आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर आयोगाने EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना SEBC आरक्षणाचा प्रवर्ग निवडण्याची संधी दिली. यावेळी मराठा उमेदवारांनी अर्ज दुरूस्त करून EWS प्रवर्गातून SEBC प्रवर्गाची निवड केली.
मात्र, आता मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांना आपल्या प्रोफाईलवरती SEBC प्रवर्गाऐवजी पूर्वीप्रमाणेच EWS किंवा Uncategorized म्हणजेच खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्याचे दाखवले जात आहे. मुख्य परीक्षेला अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल असल्याने या परीक्षेला मुकण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे हजारो मराठा उमेदवार मानसिक तणावात असून मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा की आयोगाचा हा गोंधळ सोडवावा या दुविधा मनस्थितीत आहेत. दरम्यान, ही तांत्रिक अडचण असून यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल असे आयोगाकडून सांगण्यात आल्याचे काही विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.
________________________________
"मी पूर्व परीक्षेसाठी अगोदर खुल्या प्रवर्गातून अर्ज केला होता. SEBC आरक्षण जाहीर झाल्यानंतर आयोगाने प्रवर्ग बदलायची संधी दिली तेव्हा मी SEBC प्रवर्ग निवडला होता. पूर्व परीक्षेतून आता मी मुख्य परीक्षेला पात्र ठरलो आहे. मात्र माझ्या आयोगाच्या प्रोफाईलवर मुख्य परीक्षा अर्ज भरताना Uncategorized प्रवर्ग दाखवत आहे. त्यामुळे खूप गोंधळ उडाला आहे. परीक्षा तोंडावर आहे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलेली आहे. अशात अभ्यास करायचा कि हा गोंधळ मिटवायचा असा प्रश्न आहे. प्रवर्ग बदलल्याच्या गोंधळामुळे माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना अर्ज बाद होण्याची भीती आहे."
- आकाश, एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थी