"एक पेड माँ के नाम" मोहिमेअंतर्गत औषधी वनस्पतींची लागवड
डॉ. दिगंबर मोकाट यांनी येणाऱ्या पिढीला पुरेसा ऑक्सिजन मिळावा आणि ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील औषधी वनस्पती सह- सुविधा केंद्र पश्चिमी विभाग आणि मध्य प्रदेशातील मुरैना येथील सुजागृति सेवा संस्था यांच्या वतीने नवीन गृहनिर्माण मंडळ कॉलनी मोरेना, झंडा चौक येथे "एक पेड माँ के नाम " कार्यक्रमाअंतर्गत औषधी वनस्पती रोपांची लागवड करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "एक पेड माँ के नाम" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या काळात वाढत्या ग्लोबल वार्मिंगपासून सुटका करून या पृथ्वीचे भविष्य सुरक्षित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमास औषधी वनस्पती सह- सुविधा केंद्र पश्चिमी विभागाचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. श्रीपाद महामुनी, पुणे व मध्य प्रदेश राज्य औषधी वनस्पती मंडळाचे सल्लागार डॉ. पवन यादव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. दिगंबर मोकाट यांनी येणाऱ्या पिढीला पुरेसा ऑक्सिजन मिळावा आणि ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी वृक्ष लागवडीचे महत्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. श्रीपाद महामुनी म्हणाले, आयुर्वेदासाठी औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण झाडे प्रदूषणाच्या विषापासून आणि रोगापासून आपले संरक्षण करतात.
कार्यक्रमात हाऊसिंग बोर्ड कॉलनी, मोरेना येथील मान्यवरांच्या हस्ते 20 औषधी रोपांची लागवड करून 200 औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले. त्यात गुग्गुळ, बहावा, जांभूळ, बेहडा व हिरंडा आदी रोपांचा समावेश होता. कार्यक्रमात मुरैना येथील नागरिक मा. श्री. राजेंद्रसिंग तोमर, सूरजसिंग सिकरवार, बदनसिंग जदौन, लक्ष्मणसिंग सिकरवार, जशवंतसिंग सिकरवार, राम प्रकाशसिंग सिकरवार, फौजी गब्बरसिंग कंसाना व वसाहतीतील लोक सहभागी होऊन ही मोहीम पुढे चालू ठेवण्याचा तसेच वनस्पतींचे संवर्धन व संवर्धनात महत्वाची भूमिका बजावण्याचा संकल्प केला. सुजागृती सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष झाकीर हुसेन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास केंदाचे अधिकारी विवेक राय यांनी सहकार्य केले.