मराठी विषय बंद पाडणाऱ्या कॉलेजची संलग्नता रद्द करा; अभिजात दर्जा नंतरही अवहेलना?

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तरी विद्यापीठाने पुढाकार घेऊन काही नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रम घेऊन मराठीचा अभिजात भाषा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने भूमिका घेणे अपेक्षित होते.

मराठी विषय बंद पाडणाऱ्या कॉलेजची संलग्नता रद्द करा; अभिजात दर्जा नंतरही अवहेलना?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University)पदाधिकारी आनंद उत्सव साजरा करत आहेत. परंतु, त्याच मराठी भाषेला मान सन्मान मिळावा, यासाठी विद्यापीठ जराही प्रयत्न करताना दिसत नाही. ही खेदाची बाब आहे.त्यातच विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील (Colleges affiliated to the University)विद्यार्थ्यांना मराठी विषय घेता येऊ नये, यापेक्षा मोठी दुर्दैवाची घटना दूसरी कोणतीही असू शकत नाही. विद्यापीठाची स्थापना मराठी भाषेच्या विकासासाठी करण्यात आली होती. मात्र, त्याच विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषय घेण्यापासून संलग्न महाविद्यालय रोखत असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. या विद्यापीठाशी संलग्न कस्तुरी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची (Colleges of Kasturi Education Institute)मजल मराठी विषय बंद पाडण्यापर्यंत या गेली आहे.त्यामुळे विद्यापीठावर कठोर कारवाई करावी,अन्यथा विद्यापीठाविरोधात मोठे आंदोलन उभे केले जाईल,असा इशारा युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव (Yuva Sena Joint Secretary Kalpesh Yadav)यांनी दिला आहे.

पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भाषा भावनांच्या इमारतीचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले.परंतु, काही दिवसातच इमारत बंद करून ठेवण्यात आली. आता या इमारतीमध्ये विविध अभ्यासने बसवण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा कानावर आली आहे. मराठी विभाग एका लहानशा इमारतीमध्ये कोपऱ्यात सुरू आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तरी विद्यापीठाने पुढाकार घेऊन काही नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रम घेऊन मराठीचा अभिजात भाषा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने भूमिका घेणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठ याबद्दल हालचाली करताना दिसत नाही.तसेच बहुतांश महाविद्यालयांमधील मराठी विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने आपल्या मराठी विषयाच्या प्राध्यापिकेला कामावरूनही काढून टाकले आहे. त्यावर विद्यापीठाने काहीही कारवाई केली नाही.त्यामुळे विद्यापीठाची मराठी विषयाबद्दलची असलेली अनास्था सातत्याने दिसून येत आहे. 

कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी नुकतीच विद्यापीठाकडे मराठी विषय शिकवण्यापासून महाविद्यालय रोखत असल्याची लेखी तक्रार केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी विषय घेता आला नाहीच, शिवाय संबंधित विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिकेला सुद्धा नोकरी गमवावी लागली. विद्यापीठाच्या एका समितीने संबंधित महाविद्यालय चुकीचे वागत असल्याचा निर्णय देऊनही या महाविद्यालयाने मराठी विषयाबाबत चुकीची भूमिका घेतली, असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने कस्तुरी शिक्षण संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची संलग्नता रद्द करावी. या मागणीचे निवेदन कल्पेश यादव यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना दिले आहे.

कल्पेश यादव म्हणाले, विद्यापीठाला माय मराठीचा सन्मान राखता येत नसला तरी आम्हाला मराठी भाषेबद्दल नितांत आदर आहे. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाविरोधात कारवाई न केल्यास आम्हाला मोठे आंदोलन उभे राहावे लागेल. मातृभाषेवर प्रेम करणारी आमची पिढी आहे. मातृभाषेला आई मानणाऱ्या आमच्या तरुणाईला भाषा शिकण्याची संधी मिळत नसेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. येत्या आठ दिवसात यासंदर्भात विद्यापीठाने खुलासा करावा, अन्यथा युवासेनेतर्फे केल्या जाणाऱ्या आंदोलनाला सामोरे जावे.