केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाच्या जागा झाल्या कमी; हस्तांतरण धोरणातही केला मोठा बदल 

केंद्रीय विद्यालयाने (KV) प्रत्येक वर्गात 8-8  जागा कमी केल्या आहेत.

केंद्रीय विद्यालयातील प्रवेशाच्या जागा झाल्या कमी; हस्तांतरण धोरणातही केला मोठा बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सध्या देशभरातील केंद्रीय विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया (Admission Process in Kendriya Vidyalayas)सुरु आहेत.अशा परिस्थितीत केंद्रीय विद्यालय संघटनेकडून (kvs)मोठे बदल करण्यात आले आहेत. KV ने जारी केलेल्या प्रवेश अधिसूचनेमध्ये केवळ 32 जागांसाठी अर्ज (Application for 32 seats only)मागविण्यात आले आहेत. आतापर्यंत प्राथमिक ते उच्च माध्यमिकपर्यंत प्रत्येक वर्गात ४०-४० जागा होत्या. याचाच अर्थ आता केंद्रीय विद्यालयाने (KV) प्रत्येक वर्गात 8-8  जागा कमी केल्या आहेत.

वर्गातील जागा कमी करण्याबरोबरच शाळेतील मुलांच्या हस्तांतरण धोरणातही मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय विद्यालयात सरकारी नोकरीत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांना तसेच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या मुलांना प्रवेश दिला जातो. पालकांची अन्यत्र बदली झाली, तर मुलांनाही आंतरराज्य बदलीची सुविधा मिळत होती. आता यात बदल करण्यात आला आहे. पूर्वी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांची राज्याबाहेर बदली झाल्यास, मुलांना दुसऱ्या राज्यातील शाळेत हस्तांतरीत केले जात होते. मात्र, आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची बदली झाली तर मुलांना इतर राज्यातील केंद्रीय विद्यालयाच्या शाळेत प्रवेश दिला जाणार नाही.

पूर्वी जागा रिक्त असल्यास सर्व पालकांच्या मुलांना बदली करण्याची सुविधा होती. मात्र, आता फक्त सरकारी नोकरीत असलेल्या पालकांच्या मुलांनाच ही सुविधा मिळणार आहे. खाजगी नोकरीत काम करणाऱ्या लोकांच्या मुलांना राज्य हस्तांतरण सुविधेचा लाभ मिळणार नाही.दरम्यान ,केंद्रीय विद्यालयांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात अर्ज येतात. अशा स्थितीत जागा कमी करणे विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही अडचणीचे ठरणार आहे.