खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने दिली राज्य सेवेची परीक्षा

मागील परीक्षेत तो पीएसआय पदासाठीच्या मुलाखतीमध्ये थोडक्यात हुकला. त्यानंतर मात्र, त्याने जिद्द सोडली नाही. तो कला शाखेचा पदवीधर असून एखाद्या शासकीय पदावर अधिकारी होण्याची त्याची इच्छा आहे.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने दिली राज्य सेवेची परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

खुनाच्या प्रकरणात कारागृहामध्ये (Murder case) असलेल्या एका तरूणाने पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून चक्क राज्यसेवा पूर्वपरीक्षा (State Service Preliminary Examination) दिल्याचे समोर आले आहे. या तरुणाला खून केल्याच्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. मागील पाच महिन्यांपासून तो पुण्यातील येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी आहे. 

मागील परीक्षेत तो पीएसआय पदासाठीच्या मुलाखतीमध्ये थोडक्यात हुकला. त्यानंतर मात्र, त्याने जिद्द सोडली नाही. तो कला शाखेचा पदवीधर असून एखाद्या शासकीय पदावर अधिकारी होण्याची त्याची इच्छा आहे. याआधी त्याने विविध स्पर्धा परीक्षा दिल्या आहेत. मात्र, त्याला यश थोडक्यात हुलकावणी देत राहिले. 

खुनाच्या प्रकरणात त्याला जामीन मिळालेला नसताना त्याची जिद्द बघून जुन्नर सत्र न्यायालयाने त्याला परीक्षा देण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर त्याने वाघोली येथील परीक्षा केंद्रावर जाऊन पोलीस बंदोबस्तात नुकतीस पार पडलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिली. 

जितेंद्र पांडुरंग घोलप याच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात एका २० वर्षीय मुलाच्या हत्येचा आरोप आहे. मृत मुलाच्या वडिलांनी ३ ऑगस्ट रोजी मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. ओतूर पोलिसांच्या तपासात आरोपी आणि मृत मुलामध्ये १ ऑगस्ट रोजी वारंवार कॉल झाल्याचे सीडीआर, टॉवर लोकेशन आणि कबुली जवाब या गोष्टींच्या आधारे पोलिसांनी आरोपी आणि सहआरोपी यांना पकडले. 

या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी ऑगस्ट २०२४ पासून तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी आहे. या प्रकरणाबद्दल त्याचा जमीन अर्ज राजगुरुनगर सत्र न्यायालयात प्रलंबित होता. परंतु, सुनावणी झाली नव्हती  म्हणून जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायाधीश अनंत एच. बाजड यांनी त्याला पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रमध्ये घेऊन जाण्यासाठी आदेश पारित केला. आरोपी जितेंद्र याने पोलीस बंदोबस्तात वाघोली येथील केंद्रावर जाऊन परीक्षा दिल्याची माहिती आरोपीच्या वकीलांनी दिली.