आता विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वानुसार बापाच्या जागेवर नोकरीचा अधिकार!

विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

आता विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्त्वानुसार बापाच्या जागेवर नोकरीचा अधिकार!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर (principle of compassion) मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी (Compassionate job for married girl) नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) दिला.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. आई आणि मोठ्या बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला.

वेकोलि तर्फे नॅशनल कोल वेज अॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण हा अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर खुशबू चौतेल यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. 

खुशबू यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलाने छत्तीसगड उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले. त्यावर न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी या प्रकरणाची हा निर्णय दिला.