कला शिक्षणात प्रात्यक्षिक आणि लेखी चाचणी अनिवार्य; पहिली ते आठवीच्या मूल्यमापनात महत्त्वाचे बदल

राज्यातील नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक मंगेश जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

कला शिक्षणात प्रात्यक्षिक आणि लेखी चाचणी अनिवार्य; पहिली ते आठवीच्या मूल्यमापनात महत्त्वाचे बदल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्यातील नवीन अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी सुधारित सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) संचालक मंगेश जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. कला शिक्षणात आता प्रत्यक्ष सादरीकरणासह लेखी चाचणीही अनिवार्य करण्यात आली आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येणार आहे आणि शाळांना विषयनिहाय मूल्यमापन कसे करावे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन देण्यात आले आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी हे बदल लागू झाले आहेत. ज्या विषयांची नावे बदललेली नाहीत किंवा जुना अभ्यासक्रम सुरू आहे, त्यांच्यासाठी पूर्वीची मूल्यमापन पद्धती कायम राहील. ‘परिसर अभ्यास’ या विषयाचे नाव बदलून ‘आपल्या सभोवतालचे जग’ असे करण्यात आले आहे. इयत्ता तिसरी व चौथीमध्ये या विषयासाठी आकारिक मूल्यमापनाला ६० टक्के आणि संकलित मूल्यमापनाला ४० टक्के गुणभार असेल, तर इयत्ता पाचवीसाठी दोन्ही प्रकारांचा गुणभार प्रत्येकी ५० टक्के राहील. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षांसाठी पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणेच कार्यवाही केली जाणार आहे.

इयत्ता सहावीपासून सुरू झालेल्या व्यावसायिक शिक्षणासाठी प्रात्यक्षिकांना ७५ टक्के तर लेखी परीक्षेला २५ टक्के गुणभार निश्चित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वर्षभरात सजीवाधारित, यंत्र व साहित्याधारित आणि मानवी सेवाधारित या तीन कार्यक्षेत्रांमधून प्रत्येकी एक असे एकूण तीन प्रकल्प पूर्ण करणे अनिवार्य आहे. प्रकल्पांचे मूल्यमापन करताना विषयाची निवड, नियोजन, साधनांचा वापर, सुरक्षिततेचे नियम, समस्या सोडवण्याची क्षमता, निष्कर्ष आणि सादरीकरण या बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत.

प्रकल्प व उपक्रम पुस्तिकेचे मूल्यमापन केवळ सत्राच्या शेवटी न करता कामाच्या प्रत्येक टप्प्यावर करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी नियमित अभिप्राय देण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बदलांमुळे मूल्यमापन अधिक व्यावहारिक आणि कौशल्य आधारित होईल, असे अपेक्षित आहे.

हे बदल विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कौशल्ये आणि व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. शाळांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.