संपूर्ण राज्यात खळबळ! चहावाल्याने केला ५ कोटींचा बोगस मेडिकल सर्टिफिकेट्स घोटाळा 

उत्तर प्रदेश पोलिसांनी एटा येथे बनावट वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठाशी संबंधित एक घोटाळा उघडकीस आणला आहे; यात विद्यार्थ्यांकडून बनावट पदव्या आणि गुणपत्रिकांसाठी पैसे उकळले जात असल्याचा आरोप आहे.

संपूर्ण राज्यात खळबळ! चहावाल्याने केला ५ कोटींचा बोगस मेडिकल सर्टिफिकेट्स घोटाळा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील पोलिसांनी बोगस मेडिकल कॉलेज आणि विद्यापीठ चालवणाऱ्या एका मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. विद्यार्थ्यांकडून डिग्री व मार्कशीट देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये हडप करणाऱ्या या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्वांत लक्षवेधी बाब म्हणजे या बोगस संस्थेचा मुख्य सूत्रधार भगवान दास हा मूळचा चहाविक्रेता असल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

मारहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना समोर आली. १६ सप्टेंबर रोजी रामसेवक नावाच्या व्यक्तीने ११२ क्रमांकावर कॉल करून भाऊ सतेंद्र कुमारने काही लोकांचे अपहरण केल्याची तक्रार केली आणि सुटकेसाठी २० लाख रुपयांची मागणी असल्याचे सांगितले. पोलिसांनी सतेंद्रला आग्रा येथून ताब्यात घेतले. मात्र तपासात अपहरणाचे प्रकरण पूर्णपणे बनावट असल्याचे उघड झाले. सतेंद्रने स्वतःच हा बनाव रचला होता, जेणेकरून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले पैसे परत मागू नयेत.

तपासात असे समोर आले की, ‘बीएस मेडिकल कॉलेज अँड युनिव्हर्सिटी’ या नावाने डी-फार्मा, बी-फार्मा, बी.एस्सी. नर्सिंग, डीएमएलटी, बीएमएलटी, जीएनएम आणि एएनएम यांसारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी फसवणूक करून प्रवेश दिले जात होते. विद्यार्थ्यांना डिग्री व मार्कशीट देण्याचे आश्वासन देऊन मोठी रक्कम वसूल केली जात होती. अनेक विद्यार्थ्यांकडून पैशांची वसुली सुरू होती.

या प्रकरणात सतेंद्र कुमार, गौरव अग्रवाल, भगवान दास, नरेंद्र उर्फ पप्पू आणि मोहम्मद शरीफ कुरैशी यांना अटक करण्यात आली. भगवान दास हाच बोगस कॉलेज-विद्यापीठ चालवत होता. पोलिसांनी लॅपटॉप, बोगस धनादेश, विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, फी पावत्या, हजेरी पत्रके आणि मार्कशीट्स यांसारखे अनेक पुरावे जप्त केले. सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले असून सखोल चौकशी सुरू आहे. इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचीही चौकशी केली जात आहे.