बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे पात्रता निकष शिथिल; शून्य पर्सेंटाईलला प्रवेश मुदतवाढ
भारतीय परिचर्या परिषदेने बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वेळापत्रकानुसार आता सीईटीमध्ये शून्य पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकेल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय परिचर्या परिषदेने बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वेळापत्रकानुसार आता सीईटीमध्ये शून्य पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकेल. यापूर्वी पात्रता निकष कितीपर्यंत कमी करण्यात येणार याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शून्य पर्सेंटाईलला प्रवेश खुला झाल्याने आतापर्यंत वंचित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. प्रवेश प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
राज्य सरकारने यंदा सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण देणाऱ्या आठ महाविद्यालयांचे पदवी परिचर्या महाविद्यालयांत रूपांतर केले. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न पाच परिचर्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी क्षमतेत वाढ केली. यामुळे राज्यातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये सुमारे एक हजार जागांची भर पडली. ही वाढ अलीकडेच झाल्याने अनेक विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ होते. परिणामी अनेक महाविद्यालयांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या.

जागा रिक्त राहिल्याने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय परिचर्या परिषदेला पत्र पाठवून पात्रता निकष शिथिल करण्याची व प्रवेश मुदत वाढवण्याची विनंती केली. परिषदेने औरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या रिट याचिकेचा संदर्भ देत ही मागणी मान्य केली. त्यानुसार पात्रता निकष शून्य करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत चालू राहील. यामुळे शून्य पर्सेंटाईल असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
ही मुदतवाढ केवळ महाराष्ट्रासाठीच लागू आहे. अन्य कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला याचा आधार घेता येणार नाही. परिषदेने स्पष्ट केले आहे की ही एकदाच देण्यात आलेली विशेष सवलत आहे. अंतिम मुदतीनंतर आणखी मुदतवाढ मागितली तरी ती स्वीकारली जाणार नाही. निश्चित तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशास परवानगी दिली जाणार नसल्याचेही परिषदेने सांगितले आहे. या निर्णयामुळे राज्यातील नर्सिंग शिक्षणातील रिक्त जागा भरण्यास मदत होईल आणि अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल.