विद्यापीठ प्रशासनाचा सावळा गोंधळ; माजी कुलगुरूंनाच प्रवेशद्वारावर अडवले
मंगळवारी विद्यापीठाचे एक माजी कुलगुरू आपल्या गाडीने विद्यापीठात प्रवेश करत असताना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. तसेच आपणाला कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली. रस्त्याने जाणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी हा सगळा प्रसंग पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की हे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांना अडवू नका.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ आवारात आंदोलन करण्यावर निर्बंध घातले तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात फिरण्यास बंदी घातल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन केले. मात्र,अजूनही विद्यापीठाने सुरक्षेबाबत पूर्ण तयारी करून उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. दरम्यान,मंगळवारी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची गाडी अडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ आवारात कोणत्या विषयावर आंदोलन करावे आणि कोणत्या विषयावर आंदोलन करू नये, या संदर्भातील ठराव मंजूर केला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रक काढले. त्यातच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात बॅरीगेट लावून विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावर विविध 12 विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले.त्यानंतर प्रशासन दोन माऊल मागे आले.परंतु, पूर्व तयारी न केल्यामुळे विद्यापीठात काही अनुचित घटना घडत आहेत.
विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार मुख्य प्रवेशद्वार, आयुका गेट आणि खडकी गेटमधून प्रत्येकाची चौकशी करूनच विद्यापीठ परिसरात सोडले जात आहे. मंगळवारी विद्यापीठाचे एक माजी कुलगुरू आपल्या गाडीने विद्यापीठात प्रवेश करत असताना सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. तसेच आपणाला कोठे जायचे आहे, अशी विचारणा केली. रस्त्याने जाणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी हा सगळा प्रसंग पाहिला. त्यानंतर विद्यार्थ्याने सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की हे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांना अडवू नका.
विद्यापीठात सीसीटीव्ही यंत्रणा अजूनही कार्यक्षम पद्धतीने काम करत नाही. सीसीटीव्ही कॅमेरा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप एका निनावी पत्राद्वारे करण्यात आला. मात्र, विद्यापीठाने पा पत्राची दाखल घेतली नाही. तसेच सुरक्षा विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र अद्याप त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही.
विद्यापीठात प्रवेश करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात आहे. सध्या विद्यापीठात कार्यरत असलेल्या एका अधिष्ठात्याची गाडी सुद्धा मंगळवारी आयुका गेट येथे थांबविण्यात आली होती. विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना थांबवणे एक प्रकारे अपमान कारक आहे. विद्यापीठाने दुचाकी व चार चाकी वाहनांना स्टिकर उपलब्ध करून द्यावेत. त्यामुळे संबंधित चार चाकीमधील व दुचाकी वरील व्यक्ती ही विद्यापीठातील कर्मचारी आहे, याची खात्री पटवणे सोपे जाईल. तसेच सुरक्षा विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांना प्रमुख प्रवेशद्वारावर नियुक्त केल्यास माजी कुलगुरू, अधिष्ठाता अशा व्यक्तींना थांबवण्याच्या अनुचित घटना घडणार नाहीत.
दरम्यान, विद्यापीठाने आंदोलनावर निर्बंध घातलेल्या पत्रकावर आज (दि. 4) विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात काय निर्णय घेतला जाणार, याकडे सर्व विद्यार्थी संघटनांचे लक्ष लागले आहे.