UEI ग्लोबल पाककला स्पर्धेत विनोद विश्वकर्माला ‘मास्टरशेफ' चा किताब
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्यांना अनुक्रमे रुपये ५१ हजार , ३१ हजार आणि ११ हजार इतकी रोख रक्कमेची पारितोषिके, पदके, प्रतिष्ठित मास्टर शेफ पदवी तसेच गोल्डन शेफ कोट देऊन गौरविण्यात आले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
UEI ग्लोबल या शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या UEI Culinary Competition (UCC) 2025 या पाककला स्पर्धेत पुण्यातील ओंकार देशमुख याने दूसरा आणि दंडोटी मोहम्मद दानिश रियाज याने तृतीय क्रमांक पटकावला. तर दिल्ली येथील विनोद विश्वकर्मा यांने प्रथम क्रमांक पटकावत 'मास्टरशेफ UCC 2025' हा मानाचा किताब मिळवला. हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेस राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
UEI Culinary Competition (UCC) 2025 ही तीन दिवसांची भव्य पाककला स्पर्धा मुळशी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मिस्ट्री बॉक्स चॅलेंज, ड्रेस अ केक, ग्लोबल बिर्याणी आणि इनोव्हेशन फ्युजन अशा विविध फेऱ्यांचा समावेश होता. स्पर्धेचा अंतिम टप्पा नॉकआऊट स्वरूपाचा असल्याने अंतिम फेरी अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरली.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या आणि उपविजेत्यांना अनुक्रमे रुपये ५१ हजार , ३१ हजार आणि ११ हजार इतकी रोख रक्कमेची पारितोषिके, पदके, प्रतिष्ठित मास्टर शेफ पदवी तसेच गोल्डन शेफ कोट देऊन गौरविण्यात आले. “मिस्ट्री बॉक्स चॅलेंज” फेरीचे विजेते पद पुण्याच्या शैलेंद्र परदेशी याने मिळवले तर दिल्लीच्या अनिमेष अंबर याने “ग्लोबल बिर्याणी” फेरीचे विजेते पद मिळवले.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना , युईआयचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) मनीष खन्ना म्हणाले, या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अन्नाविषयीची आवड जोपासण्याची, कौशल्ये विकसित करण्याची आणि व्यावसायिक शेफ म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. UCC हे केवळ स्पर्धेचे व्यासपीठ नसून, उद्योगातील दिग्गजांशी संवाद साधण्यासाठी, नेटवर्किंगसाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक भक्कम मंच आहे.
पुरस्काराचे वितरण शेफ देविंदर कुमार (अध्यक्ष, ICF), शेफ सिरीश सक्सेना (उपाध्यक्ष, ICF), पंकज सक्सेना (महाव्यवस्थापक- GM रॅडिसन ब्लू) देवव्रत जटेगावकर (व्यवस्थापकीय संचालक - MD शेफ्स हॉस्पिटॅलिटी) श्रीकांत पात्रो (कार्यवाहक महाव्यवस्थापक Acting GM, रिट्झ-कार्लटन) यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यंदा हे या स्पर्धेचे तिसरे पर्व होते.