सेट परीक्षा येत्या जून महिन्यात; लवकरच अधिकृत घोषणा 

विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजना संदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सेट परीक्षा येत्या जून महिन्यात; लवकरच अधिकृत घोषणा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) सेट विभागातर्फे (set department)आयोजित केले जाणारे सेट परीक्षा येत्या जून महिन्यात (set exam in the month of June)घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या तयारीला लागावे. लवकरच त्या संदर्भातील अधिकृत घोषणा विद्यापीठातर्फे केले जाईल, असे विश्वासनीय सुत्रांकडून सांगितले जात आहे.

राज्यातील विविध विद्यापीठांची संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागांपैकी सुमारे 5 हजार प्राध्यापकांची पदे भरण्यासंदर्भात शासनाकडून हालचाली सुरू आहेत. प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी सेट परीक्षा केव्हा घेतली जाणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे. विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेच्या आयोजना संदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.विद्यापीठाला सेट परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सेट परीक्षा आयोजनाच्या संदर्भातील समितीच्या परवानगी नंतर लवकरच विद्यापीठाकडून सेट परीक्षेच्या तारखेची घोषणा केली जाईल.

विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे आत्तापर्यंत सुमारे 40 परीक्षा घेण्यात आल्या.या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या. नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जात होती. परंतु पेपर फुटीच्या घटनेमुळे नेट परीक्षा पुन्हा एकदा ऑफलाइन पद्धतीने घेतली जावू लागली. त्यामुळे सेट परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीनेच घेतली जाऊ शकते. सेट परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरू होती. त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने तयारीच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली होती. मात्र सेट परीक्षा ऑनलाईन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाण्याची दाट शक्यता आहे.