मोठी बातमी: TET परीक्षेच्या निकालात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ; निकाल ऑनलाइन उपलब्ध

गेल्या काही वर्षांपासून टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे साडेतीन टक्क्यांपर्यंत लागत होता. मात्र यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे 2025 टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे दहा टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे.

मोठी बातमी: TET परीक्षेच्या निकालात सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढ; निकाल ऑनलाइन उपलब्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उमेदवारांना http/mahatet.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवार आपला बैठक क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून निकाल पाहू शकतात. यंदा निकाल 10% पेक्षा अधिक लागला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात सुमारे सात टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 23 नोव्हेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आल्यामुळे यंदा टीईटी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढले होते. परीक्षा परिषदेतर्फे 12 जानेवारी रोजी अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 16 जानेवारी रोजी अंतरिम निकाल उमेदवारांच्या लॉगिन मध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निकालावर अक्षय किंवा त्रुटी नोंदवण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांना आपल्या लॉगिन मधूनच ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदवता येणार आहेत अन्य मार्गाने आलेल्या आक्षेपांचा किंवा अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे साडेतीन टक्क्यांपर्यंत लागत होता. मात्र यावर्षी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे 2025 टीईटी परीक्षेचा निकाल सुमारे दहा टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. उमेदवारांकडून अंतरिम निकालाच्या अनुषंगाने आक्षेप स्वीकारले जात आहेत. आक्षेप स्वीकारल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेतर्फे अधिकृत निकालाची टक्केवारी जाहीर केली जाणार आहे. CTET चा निकाल 20 ते 30 टक्क्यांपर्यंत लागतो. मात्र, TET चा निकाल फारच कमी लागत होता. यंदा त्यात वाढ झाल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. 

टीईटी परीक्षेस पुण्यातून 37 हजार 293 नाशिक येथून 32,031 तर नांदेड येथून 26 हजार 137 उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी राज्यभरातील एकूण 4 लाख 75 हजार 668 उमेदवारांनी नोंदणी होती. राज्यभरातील 1 हजार 420 परीक्षा केंद्रांवर या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली.