युजीसीकडून पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी लेखकांचा शोध सुरू

UGC ने 12 भारतीय भाषांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक विज्ञान या विषयातील पदवीपूर्व स्तरावर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे.

युजीसीकडून पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी लेखकांचा शोध सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) कला, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान विद्याशाखेतील विविध विषयांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी 12 भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके (Text Books in Indian Languages) तयार केली जाणार आहेत.ही पाठ्यपुस्तके लिहिण्यासाठी इच्छुक असणाऱ्या लेखक/ समीक्षक आणि प्राध्यापकांकडून युजीसीने प्रस्ताव मागवले आहेत.येत्या ३० जानेवारीपर्यंत विहित अर्जात इच्छुकांची नावे स्वीकारली जाणार आहेत.

UGC ने 12 भारतीय भाषांमध्ये कला, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक विज्ञान या विषयातील पदवीपूर्व स्तरावर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे.भारतीय भाषांमध्ये उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके लिहू शकतील,अशी वेगवेगळ्या राज्यात काही विद्यापीठे आहेत.त्या विद्यापीठांमधील लेखकांच्या टीम तयार करण्याच्या कामात समन्वय साधण्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. हा प्रकल्प विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये भारतीय भाषांमध्ये शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या एनईपीच्या ध्येयाशी सुसंगत आहे,असे युजीसीचे अध्यक्ष एम.जगदीश कुमार यांनी ट्विटरद्वारे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यात सर्व विद्यापीठांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पाठपुस्तके तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.परंतु,पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी संदर्भग्रंथ वापरले जातात.त्यांच्यासाठी बालभारतीसारखी पाठ्यपुस्तके उपलब्ध नसतात.त्यामुळे हा विषय मागे पडला होता.आता पदवी अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके तयार केली जाणार आहेत.त्यात किती किती यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.