पहलगाम हल्ला : जम्मू-काश्मीरमधील शाळा, विद्यापीठ बंद, परीक्षाही पुढे ढकलल्या
पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध दर्शवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जम्मू विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पहलगाम येथे झालेल्या भयान दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam terror attack) २८ निरापराध नागरीकांचा बळी (28 civilians killed) गेला असून २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध दर्शवण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील सर्व शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ काही दिवस बंद (Schools, colleges and universities closed) ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जम्मू विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जम्मू विद्यापीठाकडून आयोजित सर्व शैक्षणिक उपक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच नियोजित वेळेत होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीर विद्यापीठ आणि श्रीनगर येथील क्लस्टर विद्यापीठाच्या याच तारखेला होणाऱ्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच नवीन तारखांबाबत लवकरच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना कळवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात काही दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. काही पर्यटकांना धर्म विचारून त्यांना लक्ष्य करण्यात आले. या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांचा रोष उफाळून आला आहे. अनेकजण पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटनांबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम भ्याड हल्ल्यात चार दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानमधील सोशल मीडियावर देखील होताना दिसत आहे. एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर #PahalgamTerroristAttack हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तसेच #Modi हा हॅशटॅग देखील मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. हे दोन्ही हॅशटॅग पाकिस्तानमधील सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या हल्ल्याबाबत शेजारील देशात अस्वस्थता आणि अशांतता आहे हे स्पष्ट आहे.