पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ढेकणांचा सुळसुळाट; विद्यार्थी त्रस्त
ऐन परीक्षेच्या काळात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ढेकणांचा एवढा सुळसुळात झाला आहे की विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) उन्हाळी सत्र परीक्षा (Summer semester exam) सध्या सुरू आहेत. विद्यार्थी परीक्षेचा अभ्यास करण्यात मग्न आहेत. मात्र, अशा ऐन परीक्षेच्या काळात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ढेकणांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ढेकणांचा एवढा सुळसुळात (Bedbug infestation) झाला आहे की विद्यार्थ्यांवर वसतिगृह सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. रात्री झोपेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ढेकणांनी चावा घेतल्याने त्यांना शारीरिक इजा झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना ढेकणांचा त्रास आहे. उद्भवणाऱ्या समस्येविषयी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तोंडी व लेखी तक्रार दाखल केली. मात्र, गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन सुस्तीमध्येच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यापीठ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.दरम्यान, याबाबत विद्यापीठ वसतीगृह प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
काही दिवसांपूर्वीच विद्यापीठातील वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावलेली घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता परत विद्यार्थ्यांना ढेकणांमुळे शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडून येत असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. काही विद्यार्थी संघटनांकडून वसतिगृह प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाकडे या विषयी वेळोवेळी पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपल्याच मस्तीमध्ये असलेले विद्यापीठ प्रशासन कोणालाही जुमानत नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांकडून देण्यात आला आहे.
_______________________________________
ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना ढेकणांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.यामुळे विद्यार्थी शारीरिक समस्यांनी ग्रस्त झाले आहेत. वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडून येत आहेत. वसतिगृह प्रशासनाला वारंवार सांगूनही यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासन ने यावर उपाययोजना कराव्यात अन्यथा ABVP यावर आंदोलनाची भूमिका घेईल.
शिवा बारोळे प्रतिनिधी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
_______________________________________
तुरूंगात कैद्यांना जेवढा त्रास सहन करावा लागत नसेल त्यापेक्षा अधिक त्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मी रात्री झोपेत असताना ढेकणांनी माझ्या पायाला इजा केली आहे. त्यामुळे मी वसतिगृह सोडून बाहेर मित्राच्या रूमवर राहायला गेलो आहे. परीक्षेचा अभ्यास करावा की, ढेकणांचा त्रास सहन करावा समजत नाही. या प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने त्वरित दखल घेऊन, यावर उपाययोजना कराव्यात.
पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थी