'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'द्वारे १ लाख तरूणांना रोजगार प्राप्त; मंत्री लोढा यांची माहिती
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत ३ लाख ३५ हजार रोजगारासाठी २ लाख ८५ हजार युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आहे. यांपैकी १ लाख १० हजार तरूणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त झाला
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या (Chief Minister Youth Work Training Scheme) घोषणेपासून आजपर्यंत ३ लाख ३५ हजार रोजगारासाठी २ लाख ८५ हजार युवक-युवतींनी आपली मागणी नोंदवली आहे. यांपैकी १ लाख १० हजार तरूणांना प्रत्यक्षात रोजगार प्राप्त (1 lakh 10 thousand youth actually got employment) झाला आहे. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष रूजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य व रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
भविष्यातील रोजगाराची आव्हाने ओळखून आजच कार्य प्रशिक्षण देवून, रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक-युवतींना रोजगारक्षम बनविणारी, 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' ही राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेमध्ये सरकारी तसेच खासगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
योजनेविषयी माहिती देताना मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, या योजनेला फक्त शहरी विभागातच नाही तर ग्रामीण भागातही चांगला प्रतिसाद मिळत आहे. विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि त्या खालोखाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ५००० युवा रूजू झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटीद्वारे विद्यावेतन १० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे, असेही लोढा यांनी सांगितले.
या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे. ही योजना वर्षभर सुरू राहणार असून या योजनेमार्फत १० लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन लोढा यांनी केले आहे.