MPSC : लिपिक-टंकलेखन, कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर, विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
टंकलेखन परीक्षेसंदर्भात काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केल्याने तूर्तास निकाल लावता येणार नाही असे खुद्द ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक (Main Exam-2023 Clerk Typist and Tax Assistant), या संवर्गाकरिता घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी परीक्षा आणि परीक्षेचा निकाल वादात (Exam result in dispute) सापडल्याने निकाल लांबणीवर पडला (The result was delayed) आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जुलै महिन्यात टंकलेखन परीक्षा घेण्यात आली असली तरी विविध कारणांनी या परीक्षेचा निकाल रखडला होता. त्यानंतर आता टंकलेखन परीक्षेसंदर्भात काही उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केल्याने तूर्तास निकाल लावता येणार नाही असे खुद्द ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. आता निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा सर्व विद्यार्थ्यांना आहे.
MPSC च्या गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ नंतर यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन चाचणी परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे उमेदवारांनी परीक्षा पद्धतीवर आक्षेप घेतला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या परीक्षेत काही विद्यार्थ्यांना जुने संगणक दिल्याचा आरोपही केला होता. यावर ‘एमपीएससी’ला पत्र लिहून नव्याने परीक्षा घेण्याची विनंती केली. शेवटी उमेदवारांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच निकाल जाहीर केला जाईल असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी ४ ते १३ जुलै या कालावधीत घेण्यात आली. या टंकलेखन कौशल्य चाचणीत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर ३० सप्टेंबरला जाहीर करण्यात आली. सदर टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबाद येथे याचिका दाखल करण्यात आली. ही न्यायिक प्रकरणे विचारात घेता ‘लिपिक-टंकलेखक’ व कर सहायक या संवर्गाच्या अंतिम निकालाची कार्यवाही सद्यास्थितीत प्रलंबित आहे. यासंदर्भात न्यायाधिकरणाच्या न्यायनिर्णयानंतरच पुढील कार्यवाही करणे शक्य होईल असे पत्र आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.