दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाॅल तिकीट न दिल्याने कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्र्यांची शाळा फोडली

विद्यार्थ्याने फी न भरल्यामुळे शाळेने त्यांचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते. त्यामुळे पुण्यातील शाळेत मनसे कार्यकत्यांकडून खळखट्याक करत तोडफोड केली आहे. 

दहावीच्या विद्यार्थ्यांचे हाॅल तिकीट न दिल्याने कार्यकर्त्यांनी आरोग्य मंत्र्यांची शाळा फोडली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे (10th class student) परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) अडवणाऱ्या जेएसपीएम शाळेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (Maharashtra Navnirman Vidyarthi Sena) कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शाळेची तोडफोड केली. मंगळवारपासून सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. परंतु,  विद्यार्थ्याने फी न भरल्यामुळे शाळेने त्यांचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते. त्यामुळे मनसे कार्यकत्यांकडून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या शाळेत घुसून खळखट्याक आंदोलन करण्यात आले.  

इयत्ता दहावी, बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे असते. विद्यार्थ्यांवर कोणताही ताण येऊ नये, याबाबत शाळा,  पालक, शिक्षक यांच्याकडून काळजी घेतली जाते. परंतु,  लोणीकंद-वाघोली परिसरातील जेएसपीएम शाळेने आपल्याच विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीचे हॉल तिकीट अडवून ठेवले होते. काही विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी पाचवीपासून फी भरली नाही,असे सांगत त्यांच्याकडे लाख ते दीड लाख रुपयांपर्यंत शुल्क प्रलंबित असल्याचे सांगत शाळाकडून अडवणूक केली जात होती. परंतु, शाळेकडे सर्व फी भरलेले असताना शाळा प्रशासनाकडून पालकांची विनाकारण अडवणूक केली जात आहे, असा आरोप कतार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रशांत कनोजिया म्हणाले, मंगळवारपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे; तरीसुद्धा शाळेकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले जात नव्हते. विद्यार्थी व पालकांची अशा पद्धतीने अडवणूक करणे चुकीचे होते. त्यामुळे मनसे स्टाईलने खळखट्याक  आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले.

पालक मनीषा गायकवाड म्हणाल्या, माझी मुलगी इयत्ता दहावीत आहे. नुकतीच  मी  शाळेकडे 29 हजार रुपये फी भरली होती. या फीस ची नोंद सुद्धा शाळेकडे नव्हती. शाळेने माझ्याकडे एक लाख पंधरा हजार रुपये फी बाकी असल्याचे सांगितले. मात्र, सर्व फी भरलेली असताना शाळेकडून विनाकारण ही मागितली जात होती. विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर असताना अशा पद्धतीने शाळेकडून अडवणूक केली जात असल्याने पालकांनी शाळेसमोर आंदोलन केले.दरम्यान, याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.