ज्ञानज्योती योजनेअंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांना मिळणार ६० हजारांचा लाभ
बहुजन कल्याण विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्वयंम आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वाधार या दोन योजनांच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वर्षाला ६० हजारांचा लाभ मिळतो.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (Special Backward Class Students) उच्च शिक्षणासाठी अनेकदा अन्य जिल्ह्यांत जावे लागते. त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था व्हावी, याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उच्च शिक्षणासाठी अन्य जिल्ह्यांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा निवास, जेवणाच्या खर्चाचा भार पालकांना सहन करावा लागतो. त्यामुळे इतर बहुजन कल्याण विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये आदिवासी विकास विभागाची स्वयंम आणि सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वाधार या दोन योजनांच्या धर्तीवर सावित्रीबाई फुले आधार योजना (Gyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वर्षाला ६० हजारांचा लाभ मिळतो.
अर्ज कुठे कराल?
वेळापत्रक जाहीर झाल्यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे जिल्हा सहायक संचालक यांच्याकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. त्यासाठी स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, भाड्याने राहत असल्याचे करारपत्र, शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र, महाविद्यालयाचा प्रवेश पुरावा यांसारखी कागदपत्रे लागतात.
अर्जासाठी पात्रता
अर्ज भरणारा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा निवासी असवा व तो वसतिगृह प्रवेशास पात्र आहे, परंतू त्याला प्रवेश मिळाला नाही. प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेच्या शहरातील, जिल्ह्यातील तो रहिवासी नसावा. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला. अनाथ प्रवर्गासाठी महिला व बालकल्याण विभागाचे अनाथ प्रमाणपत्र, दिव्यांग प्रवर्गासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ ते 3 लाखांपेक्षा जास्त नसावे.
१२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा विद्यार्थी, विद्यार्थ्याला किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक. महिलांसाठी ३० टक्के, दिव्यांग विद्यार्थ्यांना चार टक्के आरक्षण असून, किमान ५० टक्के गुण मिळालेले असावेत. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये देण्यात येतात. त्यात भोजन भत्ता ३२ हजार, निवास भत्ता २० हजार आणि निर्वाह भत्ता ८ हजार रुपये यांचा समावेश आहे.