प्राध्यापक भरतीसाठी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आग्रही:11 हजार 87 पदे रिक्त
राज्यात प्राध्यापकांची 31 हजार 185 पदे भरण्यास मान्यता आहे. पूर्वी त्यातील 22 हजार 236 पदे भरली गेली होती. तसेच 2018 पासून 3 हजार 580 पदे भरली गेली.तर सध्या 11 हजार 87 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीला सुरुवात झाली असून NEP च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. त्यातच विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) वेळोवेळी प्राध्यापकांची रिक्त पदे (Vacancies of Professors)भरण्याबाबत सूचित केले आहे. त्यामुळे स्वतः राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत (Filling up of vacant posts of professors)आग्रही आहेत. राज्यात सध्या प्राध्यापकांची 11 हजार 87 पदे रिक्त आहेत.त्यामुळे त्यातील बहुतांश पदे भरण्याबाबत पुढील काळात हालचाली झाल्याचे दिसून येईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राज्यात प्राध्यापकांची 31 हजार 185 पदे भरण्यास मान्यता आहे. पूर्वी त्यातील 22 हजार 236 पदे भरली गेली होती. तसेच 2018 पासून 3 हजार 580 पदे भरली गेली.तर सध्या 11 हजार 87 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करून प्राध्यापकांच्या रिक्त पदांचा आढावा घेतला होता. त्यामुळे निश्चितच पुढील काळात प्राध्यापक भरतीला वेग येईल, असे बोलले जात आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची 75 टक्के पदे भरलेली असावी, असे अपेक्षित आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी पत्रक प्रसिद्ध करून सर्व राज्यांना प्राध्यापकांची पदे भरण्याबाबत सूचित केले होते. त्यातच प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंमलबजावणी कशी करणार ? असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जात आहे. त्यामुळे स्वतः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत आग्रही असून त्यांनी राज्याचे वित्त व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली असल्याचे उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही असले तरी सध्या सर्व विद्यापीठांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापक भरतीबाबत राज्यपाल कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. ही पदे स्वतंत्र आयोगाच्या माध्यमातून भरावीत, अशी भूमिका राज्यपाल कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. मात्र, ही भूमिका कायद्याच्या चौकटीत बसत नाही.त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसारच प्राध्यापकांची पदे भरावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. परंतु,अद्याप राज्यपाल कार्यालयाकडून ही स्थगिती उठवली गेली नाही. त्यामुळे राज्यपाल कार्यालय व वित्त विभाग याबाबत काय निर्णय घेणार ? यावर प्राध्यापक भरतीचे भवितव्य अवलंबून आहे.